माजी आमदार संजयमामा यांनी केवळ कमिशन मिळावे या उद्देशाने केलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामातील सर्व कारनामे जनतेसमोर पुराव्यानिशी मांडणार- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केवळ कमिशन मिळावे या उद्देशाने विधानसभा निवडणुकीपुर्वी सुरु केलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामातील सर्व कारनामे जनतेसमोर पुराव्यानिशी मांडणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी स्पष्ट केले.
सध्या माजी आमदार संजयमामा शिंदे गटाकडून विद्यमान आमदार नारायण आबा पाटील याना दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद असलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामावरुन टिकेचे लक्ष केले गेले. यावर आमदार नारायण आबा पाटील गटाकडून आज स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
यावर बोलताना प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सन २०१९ ते सन सन २०२४ मध्ये झोपा काढल्या. परंतू सन २०२४ ची विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना ११८ कोटी रुपयाच्या या कामास सुरुवात केली. या कामाचा ठेका दिलेल्या कंत्राटदाराच्या आडून प्रत्यक्षात यातील मेवा मिळवून देणारे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी कोणास दिले त्यांचे नाव स्वतः जाहीर करावे.
अन्यथा दोन दिवसात यातील सर्व सत्य बाहेर पडणारच आहे. एकीकडे करमाळा तहसिल कार्यालय स्थलांतर व दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन काम या दोन कामातुन मिळालेले कमिशन सन २०२४ च्या निवडणुकीत वापरायचे आणि विजय मिळवायचा हा या कामामागील मुख्य उद्देश होता. पण करमाळा तहसिल कार्यालय स्थलांतर काम सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी होऊ दिले नाही. यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी धरणे आंदोलन केले. यामुळे सत्तेतून पैसा व पैशाच्या जोरावर परत सत्ता हे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समिकरण मोडीत निघाले. यामुळे आता काही बाजारु कार्यकर्ते पुढे घालून माजी आमदार संजयमामा शिंदे हे जनमाणसात नाकारली गेलेली आपली प्रतिमा सुधारु पाहत आहेत. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या २४ समाविष्ट गावातील एकाही शेतकऱ्यांने मागणी न करता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी हे काम मंजुर करुन आणले. वास्तविक पाहता एखादी आमसभा घेऊन त्यावेळी बंदिस्त पाईपलाईन व करमाळा तहसिल कार्यालय स्थलांतर ही कामे जनतेसमोर मांडुन ठराव करुन मंजुर केली असती तर या कामाबाबतचे जनतेचे खरे मत त्यांना समजले असते. येत्या दोन दिवसांत या कामातील घोटाळा आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी हिंमत असेल तर स्वतः पत्रकार परिषद घेऊन या कामाची ठेकेदार व सह ठेकेदार यांची नावे करमाळा तालुक्यातील जनतेसमोर मांडण्याचे एकदा धाडस दाखवावे. शासनाची योजना मंजुर करणारे व कामाचा ठेका घेणारे हे फक्त निमगाव येथील शिंदेवाड्यातील असतात हा माढा पॅटर्न करमाळा तालुक्यातील जनता चालू देणार नाही.
सलग दोन निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे हे पराभूत झाले असुन आपल्या कार्यकर्त्यां कडून पाटील गटास बदनाम करण्याचा प्रकार त्यांनी थांबवावा असा सुचक इशारा प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिला.