जेऊरच्या भारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अनोख्या पध्दतीने स्वागत

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी सांप्रदायाचे सामाजिक विचार दर्शविणारे पथनाट्य सादर करण्यात आले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे काल जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, भारत हायस्कूल व जेऊर ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
भारत हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा, माऊली तुकाराम’चा जयघोष करत पालखीचे स्वागत केले. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, वृक्ष संवर्धन व लागवड, साक्षरता आधी सामाजिक विषयांवरती प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले.
यावेळी भारत हायस्कूलचे विद्यार्थी, प्राचार्य आबासाहेब सरोदे, यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षीकांनी टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर वारकरी फुगडीचा आनंद लुटला.
वारकरी सांप्रदायाचे मूळ सामाजिक विचार दर्शविणारे पथनाट्य सादर करून सामाजिक जागृती करणाऱ्या भारत हायस्कूलचे व विद्यार्थ्यांचे हभप.राहुल साळुंके यांनी आभार व्यक्त करून अभंगगाथा व श्री संत निवृत्तीनाथांची प्रतिमा भेट देवून सन्मानित केले.
यावेळी करमाळ्याचे नायब तहसीलदार, संस्थेचे सचिव प्रा.अर्जुन सरक, प्राचार्य आबासाहेब सरोदे, उपप्राचार्य एन.डी कांबळे, तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मार्गदर्शक फुले सर व हेळकर सर यांनी परिश्रम घेतले.