मंगळवारी महावितरणच्या कामाची आढावा बैठक ; आमदार नारायण आबा पाटील घेणार आढावा

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
मंगळवारी १९ ऑगस्टला जेऊर येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची एक बैठक होणार असून करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे स्वतः या बैठकीस उपस्थित राहणार आहेत व मतदार संघातील वीजेच्या कामांचा आढावा घेणार आहेत अशी माहिती आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की, आमदार नारायण आबा पाटील यांच्याच कालावधीत मागील काही महिन्यापुर्वी आमसभा संपन्न झाली होती. यामुळे आता पार पडलेल्या या आमसभेतील नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नावर सर्वच शासकीय विभागांनी कोणती कार्यवाही केली याची विचारणा करुन संबंधित प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी आता प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचे नियोजित केले असल्याने याची सुरुवात महावितरणच्या आढावा बैठकीपासून होणार आहे.
मंगळवारी होणार असलेलल्या या बैठकीस महावितरणच्या बार्शी येथील उपविभागीय कार्यालय प्रमुखांना सुध्दा उपस्थित राहण्याची सुचना दिली गेली आहे. तसेच करमाळा तालुक्यातील जेऊर विभाग व करमाळा विभाग तसेच माढा तालुक्यातील छत्तीस गावांशी संबंधित कुर्डुवाडी विभाग या कार्यालयातील अभियंता, सहायक अभियंता यांनाही उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच या बैठकीत आमसभेतील विषता बरोबरच महावितरणच्या शासकीय योजना, प्रस्तावित ३३/११ केव्ही उपवीज केंद्र, विद्यूत वाहीनी, ट्रान्सफॉर्मर, रिक्त कर्मचारी, वीज पुरवठा मागणी प्रस्ताव आदि कामांचाही आढावा घेतला जाणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागणी नुसार तालूक्यात प्रस्तावित ३३/११ केव्ही उपवीज केंद्र व क्षमतावाढीच्या प्रस्तावांची सद्यस्थिती तसेच चालू असलेल्या कामांची प्रगती याचाही लेखाजोखा या बैठकीत घेतला जाणार असुन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याचे सुनील तळेकर यांनी सांगितले.






