केळी निर्यात व्यवसायातून फसवणूक प्रकरणी कंदर येथील आरोपीचा जामीन फेटाळला

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-
केळी निर्यात व्यवसायातून फसवणूक केल्या प्रकरणी कंदर येथील केळी निर्यातदार दिग्विजय मोरे या आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
याप्रकरणी हकीकत अशी की, करमाळा येथील राहुल नामदेवराव जगताप यांनी आरोपी दिग्विजय सुभाष मोरे (रा.कंदर) तसेच त्याचा मित्र आरोपी नूरआली हगीघाट यांचे विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे फसवणूक केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील फिर्यादी राहुल नामदेवराव जगताप यांचे आर जे ऍग्रो कंपनी मार्फत त्यांनी आरोपी दिग्विजय सुभाष मोरे यांच्या मध्यस्थीने दुसरा आरोपी नूरआली हगीघाट याचे तलेश एंटरप्राइजेस या कंपनीला निर्यातक्षम केळीचा पुरवठा केला होता.
परंतु वरील दोघांनी संगनमताने निर्यातक्षम केळीची विक्री करून फिर्यादी राहुल नामदेवराव जगताप यांची फसवणूक केल्या बाबतचा गुन्हा दाखल झालेला होता.
तद नंतर यातील आरोपी दिग्विजय सुभाष मोरे यांनी बार्शी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणे कामी जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्रीमती रेड्डी मॅडम यांच्यासमोर झाली.
सदर प्रकरणी मूळ फिर्यादीच्या वतीने अॕड निखिल पाटील यांनी यातील आरोपी दिग्विजय मोरे यांनी यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे फिर्यादीची फसवणूक केलेली असून त्याबाबत सुद्धा दि. २० जानेवारी २०२५ रोजी त्याच्या विरुद्ध व त्याचा मित्र सोहेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच याच आरोपीविरुद्ध वर्तक नगर ठाणे येथील एका महिलेने सुद्धा वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे फसवणूक केले बाबत तक्रारी अर्ज दिलेला असून त्याची चौकशी चालू आहे.
तसेच इमरान नसीर अहमद (तुर्भे नवी मुंबई) यांनी सुद्धा एपीएमसी पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे तक्रारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची सुद्धा अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. याबाबतचा अर्ज दाखल केलेला असून त्याचीही चौकशी चालू आहे.
यातील आरोपीने विविध लोकांना बोगस चेक दिलेला असून ते सुद्धा वाटलेले नाहीत यावरून सदरील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून केळी व्यापाऱ्यांची राजरोसपणे फसवणूक चालू असल्याबाबतचा युक्तिवाद केला तसेच अप्रत्यक्षरीत्या यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक होत असल्याबाबतचा युक्तिवाद करण्यात आला.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दिग्विजय मोरे याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून सदर प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे अॕड निखिल पाटील तर सरकार पक्षातर्फे अॕड होटकर यांनी काम पाहिले आहे.





