September 5, 2026

करमाळ्यात उद्योग विकासाची कार्यशाळा संपन्न ; आरएएमपी (RAMP) च्या माध्यमातून शेतकरी-युवकांना स्वावलंबनाचे मार्गदर्शन

0
IMG-20260905-WA0045.jpg

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
केंद्र सरकार पुरस्कृत आरएएमपी (RAMP) योजणेअंतर्गत शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने जेऊर व शेलगाव येथे उद्योग विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला शेतकरी, उद्योजक, पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळेचे आयोजन शिवसेना ओबीसी सेल चे जिल्हाप्रमुख सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वामनदादा बदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी युवासेना तालुका उपाध्यक्ष शहाजी बोराडे, ओबीसी तालुका उपाध्यक्ष प्रदीप मेटे, युवासेना तालुका उपाध्यक्ष ज्योतीराम काळे, रामकृष्ण टेलर, स्टेट बँकचे करमाळा शाखेचे माधव सूर्यवंशी, जेऊरवाडीचे सरपंच अण्णासाहेब पाटील, सरपंच संतोष बदे, बापू मोरे, राहुल कर्चे, नितीन निमगिरे, संकेत मटेकर, दादासाहेब निमगिरे, बिभीषण गव्हाणे सरपंच पोफळज, प्रशांत गोडसे, हनुमंत काळेल, महेश पोटे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी श्री कर्चे म्हणाले की, करमाळा तालुक्यात प्रथमच अशा वेगळ्या दृष्टिकोनातून शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उद्योग विकासाचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन व विविध शेतीपूरक उद्योग उभारून शेतकऱ्यांना अतिरिक्त व शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि युवकांनी उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिवसेनेच्या माध्यमातून हा विचार करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

करमाळा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांमध्ये RAMP अंतर्गत उद्योग विकास, पशुपालन व शेतीपूरक व्यवसायाच्या योजनांची माहिती तळागाळातील शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही संपूर्ण टीम म्हणून काम करत आहोत. शासनाच्या विविध योजना, अनुदान व उपलब्ध संधींचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे असेही श्री. कर्चे यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत ग्रामीण भागातील पशुपालन, शेतीपूरक उद्योग, स्वयंरोजगार, उद्योग उभारणी तसेच उपलब्ध शासकीय योजना व अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक विकास कसा साधता येईल, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरी व युवकांनी पारंपरिक शेतीसोबतच पशुपालन व इतर शेतीपूरक व्यवसायांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित शेतकरी, युवक, उद्योजक, पदाधिकारी व शिवसैनिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page