हैद्राबाद-हडपसर-हैद्राबाद गाडीला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा- प्रवासी संघटनेची मागणी
जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)– जेऊर रेल्वे स्टेशनवर हैद्राबाद हडपसर हैद्राबाद या गाडी थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर प्रवासी संघटनेनी केली आहे.
सोलापूर विभागात सध्या सुरु असलेली हैद्राबाद-हडपसर-हैद्राबाद (17013/17014) या गाडीला जेऊर स्टेशनवर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. हैद्राबाद ते हडपसर (सोमवार, गुरूवार, शनिवार) तर हडपसर ते हैद्राबाद (मंगळवार, शुक्रवार, रविवार)
सोलापूर रेल्वे विभागातील कुर्डुवाडी नंतर सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे आणि दळणवळण साठी सोयीस्कर असलेले जेऊर रेल्वे स्टेशन आता जेऊर परिसरातील नागरीकांसाठी अडचणीचे झालेले आहे, ना गाड्यांना थांबा मिळत आहे, ना रेल्वे बोर्ड जेऊरकरांच्या अडचणी समजून घेत आहे. जेऊर हे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असून जेऊर रेल्वे स्टेशनला करमाळा, इंदापूर, जामखेड, कर्जत, परांडा, भूम असे सहा तालुके जोडलेली असून या तालुक्यांसाठी जेऊर हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु मोजक्याच गाड्या जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढे मोठे दळणवळणाचे जाळं असताना जेऊर रेल्वे स्टेशनवर फक्त हैद्राबाद एक्सप्रेस, सिध्देश्वर एक्सप्रेस आणि चेन्नई मेल, इंद्रायणी एक्सप्रेस ह्या चार एक्सप्रेस गाड्या तर पुणे-सोलापूर डेमो एवढ्याच गाड्यांचा थांबा आहे. रेल्वे स्टेशनवर आणखी गाड्या थांबण्यासाठी विनंती केली असता आता गाड्या थांबाव्यात यासाठी निवेदन देण्यात यावे अशी अट रेल्वे कडून देण्यात येत आहे, आजपर्यंत कित्येक निवेदने दिली परंतु फायदा काहीच झालेला नाही.
सध्या जेऊर वरून पुण्याला जायचे झाले तर सकाळी 6.20 वाजता हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस आहे त्यानंतर नऊ तासांनी दुपारी 3.30 वाजता सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आहे तर तिथून नऊ तासांनी रात्री 11.30 ला चेन्नई-मुंबई एक्सप्रेस गाडी आहे म्हणजेच जवळजवळ नऊ तासांचे अंतर तीन गाड्यांमध्ये आहे. या व्यतिरिक्त एक ही रेल्वे गाडीचा थांबा जेऊर रेल्वे स्टेशनवर नसल्यामुळे येथील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जेऊरकरांच्या समस्या आणखीनच वाढलेल्या आहेत.
हडपसर ते हैद्राबाद गाडी हडपसर येथून दुपारी 3.30 ला निघते जर जेऊर येथे थांबा दिला तर ती गाडी अंदाजे 5.30 वाजता जेऊर येथे थांबू शकेल. तर हैद्राबाद ते हडपसर गाडी हैद्राबाद येथून रात्री 8.35 ला निघते जेऊर येथे थांबा दिला तर ही गाडी जेऊर येथे अंदाजे सकाळी 8.00 वाजता थांबू शकते.
जेऊर स्टेशनवर ह्या गाडीला थांबा द्यावा अशी मागणी होत आहे.