जेऊरच्या कै मु.ना कदम सरांची नात झी-मराठी वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत ; मालिका आजपासून मिळणार पहायला
जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर यांची नात रूची नितीनकुमार कदम झी-मराठी वाहिनी वर सुरू होणाऱ्या मालिकेत मुख्य भुमिकेत पहायला मिळाणार आहे. ही मालिका आजपासून पहायला मिळणार आहे.
‘सारं काही तिच्यासाठी’ या झी-मराठी वाहिनी वरील मालिकेत कु. रूची ही मुख्य नायिकेच्या रूपात दिसणार असून, ही मालिका आज 21 आॕगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे. या मालिकेत रूची मुख्य भुमिकेत असणार आहे, दोन मैत्रीणींची ही मालिका असुन एक मैत्रीण भारतात तर दुसरी विदेशात असते,दोघांची वीस वर्षांनंतर भेट होणार असून ही पूर्णपणे कौटुंबिक मालिका राहणार आहे.
कै. मु.ना कदम सरांनीही त्याकाळी भारत शैक्षणिक संकुलात होणाऱ्या स्नेहसंमेलनलात वेगवेगळ्या कार्यक्रमात तसेच नाटकात वेगवेगळ्या भुमिका केलेल्या आहेत, त्यांचाच आशीर्वाद आणि आदर्श पुढे ठेवून ती काम करीत असून कु. रूची हीचे रसायनशास्त्र मध्ये बी.एस्स्सी तर थिएटर आर्ट्स मध्ये एम.ए चे शिक्षण मुंबई युनिवर्सीटी मध्ये केलेले आहे. तर रूची कथक मध्ये नृत्य विशारद आणि थिएटर मध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. रूची ने या अगोदर स्टार प्रवाह वर ‘विठू माऊली’ या मालिकेत प्रलोभणा ही भुमिका पार पडली असून, कलर्स मराठी वरील ‘लक्ष्मी नारायण’ तसेच फ्लॕश आॕफ या यु-ट्युब चॕनल साठी काम केलेले आहे. तर ‘तोते’ हा हिंदी फिचर्स चित्रपट एमएक्स (Mx Player) वर रिलीज झालेला आहे. लघूपट द अॕनिव्हर्सरी, मराठी जाहिरात रिलायंस निपॉन्न लाईफ इन्शुरंस, ओरा ज्वेलर्स काॕर्पोरेट चित्रपट, तसेच चुस्की लघूपटात सहाय्यक दिग्दर्शक आणि कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
तर परे है क्या, याच दिवशी याच वेळी, इसी दिन इसी वक्त आशा नाटकात ही काम केलेले आहे.सह्याद्री चॕनल वरील दम दमा दम या कार्यक्रमात इयत्ता 2 री 2002 ला प्राथमिक फेरी, इयत्ता 3 री 2003 ला उपांत्य फेरी, इयत्ता 4 थी 2004 ला अंतिम फेरीत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक ही पटकावला होता.
दरम्यान कै मुरलीधर नागनाथ उर्फ मु.ना कदम सरांनी भारत शैक्षणिक संकुलात खूप मोठे योगदान दिलेले आहे. कै मु.ना. कदम सरांचा जन्म 8 मार्च 1929 रोजी झाला. लहानपणी आई-वडीलांचे छत्र हरपले, स्वःताच्या बळावर त्यांनी पदवीचे शिक्षण सोलापूरात तर बी.टी चे शिक्षण पुणे येथे घेतले. त्यांनतर त्यांनी सोलापूरात लोणकर शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. 1952 रोजी जेऊर सारख्या गावा मध्ये लोणकर प्रशालेची शाळा जेऊर मध्ये सुरू झाली आणि मुख्याध्यापक म्हणून कदम सर ज्वाईन झाले परंतु काही वर्षांनी ही शाळा बंद झाली. त्या काळातील शिक्षणाची गरज ओळखून कदम सरांनी भारत शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि दीर्घकाळ या हायस्कूलचे प्राचार्य ही होते. अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा कायमस्वरूपी मित्र, हितचिंतक होत असे. हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मु.ना कदम सरांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक मुलात काहीतरी दडलेले असतेच. त्यास हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याची, त्याच्यातील गुणवैशिष्ट्ये शोधण्याची व त्याला प्रगतीची संधी देण्याची भूमिका त्यावेळी कदम सरांनी घेतली. कदम सरांनी ग्रामीण भागातील प्रज्ञावान, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जेऊर येथे 1972 मध्ये मोफत वसतिगृहयुक्त हायस्कूलची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच प्राचार्य ही होते. कदम सरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अप्रतिम बदल घडवून आणला आहे.संस्कारांची निर्मिती व रुजवणूक करण्यात आजचे शिक्षण अपयशी ठरले आहे. शिक्षण वळण राहिले नसून दळण बनले आहे. विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ सध्या कमी झालेली आहे, कदम सरांनी त्यावेळी केलेल्या योगदानामुळे अनेक विद्यार्थी घडले. 3 फेब्रुवारी 2016 ला कै. मु.ना कदम यांचे निधन झाले. या दिलेल्या योगदानाबद्दल कै मु. ना. कदम सर यांचे पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक भारत हायस्कूलच्या प्रांगणात हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन केले आहे.
दरम्यान कै मु.ना कदम सर यांना नितीनकुमार आणि प्रदिप कुमार दोन मुले आहेत तर दोन मुली आहेत. कु. रूची हिचे वडील प्रा.नितीनकुमार कदम हे भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक येथे प्राध्यापक तर आई प्रा. संगीता नितीनकुमार कदम के. टी. एच. एम कॉलेज, नाशिक येथे प्राध्यापिका आहेत.
आज 21 आॕगस्ट पासून रूची हीची झी-मराठी वरील नवीन मालिका पहायला मिळणार असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे