17/12/2024

पृथ्वीराज पाटलांची नवी राजकीय इनिंग बाजार समिती निवडणुकीतून होणार; लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

0
IMG-20230906-WA0030.jpg

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)-
माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे सुपुत्र, युवानेते पृथ्वीराज पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरणार असून राजकीय इनिंग ला सुरूवात करणार असून त्यांचा उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

सध्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया चालू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे काम तालुक्यातील सर्वच गटाकडून चालू आहे. पाटील गटाकडून सुध्दा या निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवले जाणार असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार निवड चालू आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की, पृथ्वीराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून दोन मतदार संघातून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघातून तसेच सोसायटी मतदार संघातून ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात पृथ्वीराज पाटील यांना उतरविण्याचा निर्णय पाटील गटाच्या निवडणूक समितीने घेतला असून माजी आमदार नारायण पाटील यांनी त्यास होकार दिला आहे. सन 2010 पासून पृथ्वीराज पाटील हे सामाजिक कामात सक्रीय असून करमाळा मतदार संघात युवकांचे संघटन करण्याची जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पेलली आहे. आपल्या दिनक्रमात पृथ्वीराज पाटील हे जास्तीत जास्त वेळ सक्रीय राजकारणासाठी देत असल्यामुळे करमाळा तालुक्यातील युवकांची पहिली पसंती म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत चालली असल्याने पाटील गटाच्या निवडणूक समितीने बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात पृथ्वीराज पाटील यांना उतरविण्याचा निर्णय घेतला.

पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारी मुळे तालुक्यातील युवकांमध्ये तसेच एकूण पाटील गटात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून त्याचा फायदा निवडणुकीत निश्चितच मिळणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले. पृथ्वीराज पाटील यांच्यासह पाटील गटाचे तसेच सहकारी मोहिते-पाटील गटाचे अनेक लोकप्रिय उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.या निवडणुकीसाठी युती अथवा आघाडी बाबतचा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेण्याचे काम चालू असून पाटील गटाकडून सध्या उमेदवार निवड व त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहितीही सुनील तळेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page