करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज- डॉ सायली नारायण पाटील
जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असून नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाने यासाठी पुढाकार घेऊन महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम हाती घ्यावेत असे प्रतिपादन डॉ सायली पाटील यांनी केले.
जेऊर येथील जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला महोत्सवाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. माजी आमदार नारायण (आबा) पाटील मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत जेऊर यांच्या वतीने दि ८ मार्च ते १४ मार्च दरम्यान महिला महोत्सव आयोजित केला गेला. यात पाककला, रांगोळी, वक्तृत्व, अभिनय, वेशभुषा, डान्स, अंताक्षरी, फनी गेम्स आदि स्पर्धा घेतल्या गेल्या.
या स्पर्धेतील विजेत्यांना आज बक्षीसे देण्यात आली. या बक्षीस वितरण समारंभच्या अध्यक्षस्थानी ज्योतीताई पाटील ह्या होत्या तर यावेळी व्यासपीठावर अनिता जगताप, जयश्री दळवी, रत्नमाला बादल, उषा सरक, विजया भोसले, सुनिता पाटील, प्रेमलता दोशी, सुचिता राठोड, अनिता दोशी, नंदा गादिया, नंदा तळे, विजया कर्णवर, रोहिणी सुतार, सुलभा घाडगे, जनाबाई कांबळे, भारती बलदोटा, ताहिरा शेख, राजश्री दोशी, वैशाली दोशी, वैशाली कोठारी आदी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ सायली नारायण पाटील म्हणाल्या की, करमाळा तालूक्यातील नागरिकांचे विशेष करुन महिला भगिनींचे आरोग्यमान उंचावण्यासाठी त्यांना आरोग्यविषयक माहिती उपक्रमाच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे. कॅन्सर सारख्या आजारांना पहिल्या पायरीवर थोपवता येते अथवा त्यापासुन मुक्ती मिळवता येते.परंतु यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी आपण वेळ देणार असुन एक सामाजिक बांधिलकी म्हणुन आपल्या शिक्षणाचा सदुपयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांचे सत्कार रोहिणी सुतार, यास्मीन शेख, संध्या हेळकर, साधना लुणावत, अपर्णा पाथ्रुडकर, रेखा तोरमल, प्रिया सोळंकी यांचे हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत जेऊर यांच्या वतीने विजेत्या महिलांना आकर्षक भेट वस्तु आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.रिया सुतार हिने सुत्रसंचलन केले तर कृष्णाई मोटे हिने आभार मानले.