ढोकरी जि.प शाळेने केले अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे स्वागत ; बैलगाडीतून काढली मिरवणूक
चिखलठाण, दि. १६ (करमाळा-LIVE)– बैलगाडीतून वाजत गाजत मिरणवणूकीने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद ढोकरी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा झाला.
जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी मुलांमध्ये व पालकांमध्ये आकर्षण निर्माण होण्या करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक सुद्धा खाजगी इंग्लिश मीडियम शाळेप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवू लागले असून याचाच एक भाग म्हणून वांगी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी येथे शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना फेटा बांधून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. शालेय परिसर आकर्षक रांगोळीने सजवला होता.कार्यालय, वर्ग फुलापानांच्या तोरणांनी सुशोभित करण्यात आले होते.यावेळी सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके शालेय व्यवस्थापन सदस्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
गोड खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक दिपक मेनकुदळे आणि शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांनी परिश्रम घेतले
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षक परिश्रम घेत असल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा दिसत आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम आमच्या शाळेत आम्ही राबवत असतो.
विवेक पाथ्रुडकर, (शिक्षक, ढोकरी)