जेऊर-चिखलठाण रस्ता झाला जीवघेणा ; त्वरित दखल घ्यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन- युवा नेते शंभूराजे जगताप
करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
अनेक वर्षांंपासून जेऊर-चिखलठाण रस्ता झाला जीवघेणा झालेला आहे. याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा नेते शंभूराजे जगताप यांनी दिला आहे.
जेऊर-चिखलठाण रोडची दुरावस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. जेऊर ते चिखलठाण प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे हा रस्ता प्रसिद्ध कोटलिंग देवस्थानाला जोडणारा असून या ठिकाणी असंख्य भक्तगण दर्शनासाठी येत असतात तसेच चिखलठाण परिसर मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक तसेच केळी उत्पादक म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे असे असतानाही शासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे चिखलठाण, शेटफळ, कुगाव आदी गावातील ग्रामस्थांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी विलंब होतो आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी जाणे येण्यासाठी रुग्ण व गरोदर माता भगिनींना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत.
त्याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेमध्ये मदत कार्य करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना सुद्धा या गोष्टींच्या सामना करावा लागला होता. रस्ता दुरुस्तीच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहेत.