03/04/2026

श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन

0
IMG-20260403-WA0066.jpg

अक्कलकोट, दि. ३ (करमाळा-LIVE)-
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थांचा १४८ वा पुण्यतिथी महोत्सव ३ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान होत आहे. त्यानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, स्वामी भक्त मनोहर पाटील – भोसीकर, उदय गायकवाड, व राजू जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया भक्तीभावाने करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे यंदाचे हे १४८ वे वर्ष आहे. महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथी पासून वटवृक्ष देवस्थानने धर्मसंकीर्तन कार्यक्रमांची सुरुवात संत साहित्याचे गाढे अभ्यासक कै.डॉ.नरेंद्र कुंटे यांच्या अधिपत्याखाली केली. ही धर्मसंकीर्तन महोत्सवाची परंपरा आजही देवस्थान समितीने जपली आहे. या धर्मसंकीर्तन महोत्सवात देशभरातील नामवंत कीर्तीचे कलाकार, गायक, कीर्तनकार आपली कला स्वामी सेवेच्या माध्यमातून श्रींच्या चरणी अर्पण करतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भरीव रंगत येते. सर्व कलाकारांनी या महोत्सवात मनोभावे श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली सेवा अर्पण करून व स्वामी कृपेचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन सर्व कलाकारांना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

आज भजनसेवेची सुरुवात भजन सेवा संयोजक तथा चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते श्री समर्थ महिला भजनी मंडळ सोलापूर यांच्या भजनसेवेने झाली. या भजन सेवेत अक्कलकोट, सोलापूर, वैराग, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, लातूर, माळीनगर, पानमंगरूळ, कोल्हापूर, पुणे इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या ४८ भजनी मंडळाची भजनसेवा होणार आहे. पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकीर्तन कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून व प्रतिमेचे पूजन करून नाशिक येथील सौ.मीरा कुलकर्णी व सहकारी यांच्या भक्ती संगीत गायन सेवेने झाली.

या धर्मसंकीर्तन सोहळ्यात विविध नामांकित मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन, भक्तीसंगीत, इत्यादी कार्यक्रम होणार आहेत, तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा व स्वामी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, अमर पाटील, संजय पाठक, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, नागनाथ गुंजले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page