शेलगावं (वां) ते ढोकरी रस्त्याच्या कामाला आमदार संजयमामांमुळेच मंजुरी- विवेक येवले यांचे प्रतिपादन
करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)-
शेलगावं (वां) ते ढोकरी या चौदा कि.मी.लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरण, डांबरीकरणाच्या कामाला आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून आता हे काम सुरू झाले असल्याची माहिती संजयमामा समर्थक, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना येवले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था होती त्यामुळे या परिसरातील आठ-दहा गावांच्या दळणवळण व वाहतुकीचा प्रश्न बिकट झालेला होता. याविषयी या भागातील कार्यकर्ते व नागरिकांनी ही बाब आमदार संजयमामांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आमदार या नात्याने या मागणीचा वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले व या संदर्भात दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी अधीक्षक अभियंता,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुणे, कार्यकारी अभियंता, सोलापूर यांना पत्राद्वारे पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार आता २ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या या कामास आता सुरुवात झाली असून यामुळे या परिसरातील दळणवळण व वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला आहे.
सध्या आचारसंहिता सुरू असल्याने या रस्तेकामाचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन ह.भ.प.निंबाळकर महाराजांच्या हस्ते केल्यानंतर हे काम सुरू झालेले आहे.