08/06/2025

जेऊर येथे एसटी बस मध्ये चढणाऱ्या महिलेचे आठ तोळ्यांचे दागिने लंपास

0
IMG-20240508-WA0070.jpg

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
पुणे येथून रेल्वेने जेऊर स्टेशन येथे उतरल्यानंतर जेऊर बस स्थानकावर एसटी मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील आठ तोळ्यांचे दागिने अज्ञाताने लंपास केले आहेत. मंगळवार दि. ७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता जेऊर बसस्थानकावर हा प्रकार घडला आहे.

याबाबत करमाळा शहरातील भवानी पेठ येथील गितांजली संतोष राठोड (वय-५३ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ७/५/२४ रोजी सकाळी हडपसर येथून त्या पती संतोष यांच्यासह डेमो रेल्वे गाडीने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जेऊर रेल्वे स्टेशनवर उतरल्या. त्यानंतर करमाळ्याला जाण्यासाठी त्या पतीसह जेऊर बसस्टॉपवर पायी चालत गेल्या. तेव्हा बसस्टॉपवर एक बस नुकतीच आलेली होती व त्या बसच्या दरवाजा जवळ अंदाजे ३० ते ४० लोक बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करून थांबलेले होते. या गर्दीतून त्या पतीसह बसमध्ये बसल्यानंतर खांद‌याला अडकवलेल्या पर्सची चेन उघडी दिसल्याने सौ. राठोड यांनी पर्समध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता त्यांना पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. सदर पर्समध्ये ४ तोळे वजनाचे सोन्याचे गंठन आणि ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडया असे अंदाजे ४ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे सौ. राठोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

करमाळा पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. माहूरकर पुढील तपास करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page