पार्डीत दिवसढवळ्या घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लंपास- नागरिकांमध्ये घबराट
करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी येथे दिवसढवळ्या घरफोडी झालेली असून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पार्डी येथील विक्रम विश्वनाथ चौघुले हे पोल्ट्री व्यावसायिक असून, ते पार्डी येथे राहतात, शनिवारी 26 आॕगस्टला घरातील सर्वजण घराला कुलूप लावून शेतात गेले असता संध्याकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि पैसे असा एक लाख 58 हजारांचा ऐवज लंपास केला. संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान कुटुंब घरी आले असता हा प्रकार उघकीस आला.
चोरीची घटना घडलेली माहिती पडताच पोलिस निरिक्षक दसरूकर साहेब, सहाय्यक पोलिस निरिक्षक राजकुमार ससाने घटना स्थळाची पाहणी करून श्वान पथकास पाचारण केले. मात्र काहीही माहिती हाती लागली नाही. विक्रम चौघुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बाळासाहेब औताडे करीत आहेत.