करमाळ्यात जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निदर्शने

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
राज्याच्या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिलेल्या आदेशानुसार काल दि. ९ ऑगस्टला विविध मागण्यांसाठी करमाळा येथे जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
यावेळी राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तसेच शिक्षक इतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व विभागातील पदे तातडीने सरळ सेवेने भरण्यात यावे, अनुकंपा पदाची दरवर्षी भरती करावी, महिला कर्मचारी यांची बालसंगोपन रजेची मर्यादा दोन वर्षे करावी अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.
या मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल याची नोंद शासनाने घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी पाटबंधारे उपविभाग करमाळा, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. १२ करमाळा, भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र. १ करमाळा, कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र. ७ करमाळा, उजनी प्रकल्प पुनर्वसन उपविभाग करमाळा या सर्व उपविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.