No Plastic, Save Earth : कुंभेजच्या बागल विद्यालयात ‘जागतिक वसुंधरा’ दिन साजरा


जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयात ‘जागतिक वसुंधरा’ दिन साजरा करण्यात आला.
यश कल्याणी नेचर कॉन्झर्वेशन, वन विभाग, माळढोक विभाग आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना यांचे संयुक्त विद्यमाने हा वसुंधरा दिनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुलांना यावर्षीची वसुंधरा दिनाची ‘ग्रह विरुद्ध प्लास्टीक’ ही संकल्पना समजावून सांगण्यात आली.
विद्यार्थ्यांनी प्लास्टीकचा वापर व त्यांच्या दुष्परिणामांबाबत माहिती घेतली ब याबाबत चर्चा केली. पृथ्वीवरील जैवविविधता अत्यंत महत्वाची असून त्याचे संवर्धन व्हायला हवे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी केले.
यावेळी उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून पक्ष्यांना दिलासा मिळावा त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी विद्यालयाने ‘घर तेथे जलसंजीवनी’ हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे हस्ते वितरीत करण्यात आली.
सध्या 125 हून अधिक कुटुंबे पक्ष्यांची तहान भागवत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना मातीच्या जलपात्रांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे समवेत पक्षी निरीक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, किशोर कदम, बलभीम वाघमारे, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कुंभेजचे विद्यार्थी अधिक प्रयत्नशिल आहेत. निसर्गसंवर्धनासाठी पक्षीमित्रांची भूमिका ते पार पाडत आहेत हे कौतुकास्पद आहे. हेच विद्यार्थी अधिकारी होऊन वनसेवेसाठी पुढे येतील.
यादवराव जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, माळढोक पक्षी अभयारण्य, करमाळा.
उन्हामुळे पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी पाण्याच्या शोधात खूप दूर अंतरावर जावे लागते. अशा वेळेस पाण्याअभावी पक्षी चक्कर येऊन पडतात व मृत्यू पावतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना मातीच्या भांडयात पाणी ठेवावे. आपले मित्र समजून आपण त्यांची मदत करायला हवी.
सानिका पवळ, विद्यार्थिनी.
पक्षी हे बीजप्रसार, कीड नियंत्रणासह निसर्गाच्या स्वच्छतेचंही काम करतात म्हणून ते आपल्यासाठी उपयोगाचे आहेत. आम्ही निसर्ग रक्षणाचे काम करत आहोत याचा आनंद वाटतो.
प्रिया गुटाळ, विद्यार्थीनी.



