अक्कलकोट तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य दिशादर्शक; जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
अक्कलकोट तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य दिशादर्शक असल्याचे मत जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी व्यक्त केले आहे.
नुकतेच अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे भक्तनिवास मध्ये इंग्रजी भाषा शिक्षकांची तालुकास्तरीय सहविचार सभा संपन्न झाली. ही सहविचार सभा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. गुरुनाथ मुचंडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. लावंड यांनी इंग्रजी भाषा शिक्षकांशी संवाद साधला.
प्रा.लावंड म्हणाले की, अक्कलकोट तालुका इंग्लीश टीचर्स असोसिएशन च्या वतीने प्रभावीपणे राबविले जाणारे अभिनव उपक्रम व विद्यार्थ्यांच्या भाषा समृध्दीसाठी केलेले कार्य दिशादर्शक असून इंग्रजी भाषा शिक्षकांच्या परिश्रमामुळे अक्कलकोट तालुक्यातील इंग्रजी विषयाच्या गुणवत्ता वाढीस याचा नक्की फायदा होईल.
यावेळी सोलापूर जिल्हा असोसिएशनचे वतीने अध्यक्ष प्रा.लावंड यांनी तालुका अध्यक्ष प्रा. हिरेमठ सर, उपाध्यक्ष प्रा. म्हमाणे सर, सचिव प्रा. काटे सर यांचा सन्मान केला. सहविचार सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीची पुढील दिशा व जिल्हास्तरावर राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नाविन्यपूर्ण कल्पना प्रभावीपणे राबविण्याऱ्या नवोपक्रमशिल इंग्रजी भाषा शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांचे हस्ते गौरविण्यात येईल अशी माहिती प्रा. लावंड यांनी दिली. तसेच यापुढील काळात अधिक चांगला परिणाम साधण्यासाठी सर्व इंग्रजी भाषा शिक्षकांच्या एकत्रीत प्रयत्नांची गरज असून सर्वांनी सक्रीय व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांचेसह मार्गदर्शक प्रा. गुरूनाथ मुचंडे, करमाळा तालुका अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, सचिव प्रा.गोपाळराव तकीक- पाटील , सहसचिव प्रा.मारूती जाधव, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुखदेव गिलबिले, प्रा.शंकर दिरगुळे , तसेच अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते.




