करमाळ्यात उद्या इंग्रजी भाषा शिक्षक कार्यशाळा; शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र
करमाळा, दि. २८ (करमाळा-LIVE)-
करमाळा पंचायत समितीचे शिक्षण विभाग, करमाळा इंग्लिश टिचर्स असोशिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील इंग्रजी विषय शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
भविष्यातील व्यावसायिक संधी ओळखून सक्षम विद्यार्थी घडविताना इंग्रजी भाषेची भूमिका अनन्यसाधारण आहे. इंग्रजी भाषा शिक्षकांपुढील आव्हाने व विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी सदर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि. २९ जानेवारी रोजी करण्यात आले असून यशकल्याणी संस्थेचे प्रा.डॉ. गणेश करे- पाटील यांचे अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होत असून या कार्यशाळेमध्ये पुणे येथील पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यास मंडळाचे सदस्य श्रीधर नागरगोजे, संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.धनप्पा मेत्री, प्रेरक व्याख्यात्या डॉ. सुनिता दोशी, प्रोलक्स कंपनीच्या डायरेक्टर व प्रसिद्ध डॉ. प्रचिती पुंडे या तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
सदर कार्यशाळा उद्या सोमवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले यांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी सर्व इंग्रजी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा इंग्लिश लँग्वेज टिचर्स असोसिएशनचे तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी केले आहे.