३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन

कोर्टी, दि. १९ (करमाळा-LIVE)-
सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून दूर राहणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने परिवर्तन प्रतिष्ठान आणि राजेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुळव्याध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेसर उपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी हे विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे.
शौचास त्रास जाणवत असताना अनेक जण लाज किंवा गैरसमजामुळे तपासणी टाळतात. यामुळे आजार बळावून पुढे मोठ्या शस्त्रक्रियेची गरज निर्माण होऊ शकते. हीच समस्या ओळखून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रारंभीच्या टप्प्यात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार आहे.
मुळव्याध, फिशर आणि पाइल्ससारख्या आजारांची काही ठळक लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत :
शौचास आग किंवा जळजळ होणे
चिर पडणे (फिशर)
गुदमार्गाजवळ कोंब येणे किंवा रक्तस्राव होणे
शौच्याच्या जागी सतत खाज, अस्वस्थता वाटणे
ही लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व जलद बरे होण्याची सुविधा उपलब्ध असल्याने अनेक रुग्णांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
शिबिराचे प्रमुख संयोजक डॉ. अमोल दुरंदे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार सहज आणि मोफत उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. रुग्णांनी कोणतीही लाज बाळगू नये. प्रारंभिक तपासणीमुळे आजार गंभीर होण्यापासून रोखता येतो.”
शिबिराचे स्थळ :
दुरंदे हॉस्पिटल, करमाळा रोड, कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर
नोंदणी व संपर्क क्रमांक :डॉ. अमोल दुरंदे – 9960455946
हॉस्पिटल संपर्क –
9960868764, 9960583620, 9130584181, 9730320204
या शिबिरामुळे करमाळा तालुक्यातील शेकडो रुग्णांना मोफत तपासणी व मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार असून परिवर्तन प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांतून आरोग्यसेवेचे नवे पर्व सुरू होत असल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.





