गौंडरे येथे नवीन उच्चदाब वीज सबस्टेशनसाठी सर्वेचे आदेश ; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे 132 /33 KVA सबस्टेशन करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 4 नोव्हेंबर 2022 रोजी पत्रव्यवहार केलेला होता. सदर पत्रव्यवहाराला अनुसरून दिनांक 20 एप्रिल 2023 च्या महाराष्ट्र शासन अवर सचिव यांच्या पत्राद्वारे गौंडरे येथे सदर 132/33 KVA सबस्टेशन साठी सर्वे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, करमाळा मतदारसंघातील पूर्व भागामध्ये सीना कोळगाव प्रकल्प असून साधारणता त्यावर 1 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे .सदर भागांमध्ये 33 /11 क्षमतेची 7 ते 8 उपकेंद्र असून सदर उपकेंद्रास वीज पुरवठा करण्यासाठी 35 ते 40 किमी अंतरावर असलेल्या 220 /33 चे जेऊर उपकेंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यावर नवीन लोड टाकण्यासाठी मर्यादा येत आहेत .त्यामुळे पूर्व भागातील नवीन प्रस्तावित 33 /11 केव्हीए उपकेंद्रास वीज पुरवठा करण्यास मर्यादा येत आहे . गौंडरे येथे 25 ते 30 एकर गायरान जागा उपलब्ध असून त्यामध्ये 132 / 33 KVA उच्च दाब केंद्र केल्यास वरील समस्या मार्गी लागून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच भविष्यकाळात या भागांमध्ये चालू असलेल्या कृष्णा भीमा स्थीरीकरण (बोगदा) यावरून शेतकऱ्यांना पाणी उचलण्यासाठी विजेची आवश्यकता भासणार आहे. तसेच याच भागातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ही विजेची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे या भागामध्ये उच्चदाब स्टेशन होणे आवश्यक आहे .करमाळा तालुक्यामध्ये करमाळा व पारेवाडी या ठिकाणी 132 / 33 क्षमतेचे 2 उच्चदाब सबस्टेशन आहे तर जेऊर या ठिकाणी 220/ 33 सबस्टेशन आहे. त्यामुळे पूर्व भागामध्ये नवीन सबस्टेशनची आवश्यकता आहे.
आमदार संजयमामा शिंदे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्याचा प्रत्यय गेल्या 3 वर्षांमध्ये त्यांनी नवीन 3 सबस्टेशन तसेच ॲडिशनल 9 ट्रांसफार्मरला मंजुरी मिळालेली आहे. हे तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे पायाभूत काम त्यांनी केलेले आहे. तसेच गौंडरे या ठिकाणी उच्च दाब सबस्टेशन साठीही ते प्रयत्नशील आहे .यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. आवाटी, राजुरी, रायगाव येथे नवीन सबस्टेशन व पांडे ,कोर्टी, कात्रज, कविटगाव, कोळगाव, दहिवली, पिंपळनेर ,कव्हे, म्हैसगाव या जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढ 2020 ते 23 या कार्यकाळातील आहे.
नानासाहेब नीळ, माजी जिल्हा परिषद सदस्य