17/12/2024

नारायण आबाच विकासरत्न; आबांमुळे ‘आदिनाथ’ सुरू, आगामी आदिनाथ कारखाना निवडणुकीत पाटील गटाचीच सत्ता येणार- सुनील तळेकर

0
IMG-20230325-WA0011.jpg

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-
माजी आमदार नारायण पाटील यांच्यामुळेच आदिनाथ कारखाना सुरु झाला असून निवडणूक लागल्यास आदिनाथ कारखान्यावर पाटील गटाचीच सत्ता येणार असल्याचे ठाम मत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केले आहे.

सध्या करमाळा तालुक्यात आदिनाथ कारखान्याच्या आगामी निवडणुकांमध्ये काय होणार अशी चर्चा चालू असून तालुक्यातील कोणताही गट ठाम भूमिका मांडत नसल्याचे राजकीय विश्लेषक यांचे मत आहे. परंतू आज माजी आमदार नारायण पाटील गटाकडून मात्र या मतांचे खंडन करुन आदिनाथ बाबतची भुमिका स्पष्ट करण्यात आली. याबाबत माहिती देताना श्री तळेकर यांनी सांगितले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना यंदा आपला गाळप हंगाम सुरु करु शकला. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.बारामती अॕग्रो कारखान्याशी विद्यमान संचालक मंडळाने पंचवीस वर्षाचा भाडेपट्टी करार केला होता. यानंतर मात्र हा कारखाना ताब्यात घेऊन त्यापासून आपला राजपथ तयार करायचा हेतू मनात ठेऊन तालुक्यातील काही मंडळी अहोरात्र मेहनत घेत होती. बारामती अॕग्रो कारखाना असो वा यासंबधित पवार कुटुंबातील नेतृत्व असो त्यांना आदिनाथ कारखान्याशी भाडेपट्टी करार झाला काय किंवा न झाला काय याचा फारसा फरक पडणार नव्हता. परंतू मध्यस्थी मंडळींना मात्र हा करार होणे गरजेचे वाटत होते. भले मग या करारात असंख्य त्रुटी असल्या तरी चालतील, सहकार धोक्यात आला तरी चालेल पण आपली राजकीय पोळी भाजून निघाली पाहीजे असे त्यांना वाटत होते.

माजी आमदार नारायण पाटील यांनी नेमक्या याच विचारांना भेद देण्यासाठी पुढाकार घेतला व बत्तीस हजार सभासद शेतकऱ्याची बाजू मांडली. बारामती अॕग्रोचे संचालक, अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी जेंव्हा आदिनाथ ताब्यात घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर आले तेंव्हा माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन आदिनाथ चालवण्यासाठी तालुक्यातील सभासदांना एक संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने ताबा घेऊ पाहणाऱ्या मंडळींना विरोध केला. आदिनाथ कारखाना चालू व्हावा म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनीही भक्कम साथ दिली. यामुळेच मग पाटील गटाची भुमिका ठाम आहे.

आदिनाथ कारखान्याच्या आगामी निवडणुकांसाठी रणनीती तयार करणे हा भाग वेगळा आणि भुमिका मांडणे वेगळा भाग आहे. परंतू आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळावे, ऊस उत्पादकांना ऊसास चांगला दर मिळावा आणि कामगारांना वेळेवर वेतन मिळावे या भुमिकेशी माजी आमदार नारायण पाटील हे ठाम आहेत. पाटील गट हा आगामी सर्व निवडणुकांसाठी तयारीत असून युती आघाडी हा त्यावेळचा विषय आहे.मात्र पाटील गटाची निवडणूक पुर्व तयारी व रणनिती ही स्वबळावर निवडणूक लढवणार असे गृहीत धरुनच असणार आहे. विधानसभेची मध्यावधी निवडणूक असो वा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका असो, जनतेचा विश्वास आणि पाठबळ माजी आमदार नारायण पाटील यांनांच मिळणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये पाटील गटाचा विजय निश्चित असल्याची खात्री श्री तळेकर यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page