खासदार साहेब.! जेऊरकरांना ही सत्कार करण्याची संधी द्या: केम येथे दोन रेल्वे गाड्यांना मिळाला थांबा- जेऊरकरांच्या पदरी निराशाच


जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
अहो खासदार साहेब.! जेऊरकरांना ही सत्कार करण्याची संधी द्या आपल्या प्रयत्नांनी केम येथे दोन रेल्वे गाड्यांना थांबा मिळालेला असून त्याबद्दल खूप खूप आभार.! काल केम येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्याबद्दल केमकरांनी जो सन्मान केला तसाच सन्मान जेऊरकरांना करण्याची आपण संधी द्यावी हीच अपेक्षा.
निवेदन पे निवेदन करून आता जेऊरकर वैतागून गेलेले आहेत, करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या जेऊर स्टेशनवर गाड्यांना थांबा मिळण्यासाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. रेल्वेने केम रेल्वे स्टेशनला हैद्राबाद-मुंबई आणि मुंबई-पंढरपूर अशा दोन रेल्वे गाड्यांना थांबा दिला असून जेऊरकरांच्या तोंडाला मात्र पुन्हा एकदा पुसली पाने आहेत, जेऊर रेल्वे स्टेशन हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला अजूनही थांबा मिळालाच नाही.
जेऊरकरांच्या मागण्या अजूनही पूर्ण होत नसून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झालेले, जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबे मिळता मिळेना झालेले असून रेल्वे बोर्डाने पुन्हा एकदा जेऊरकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, त्यामुळे करमाळा तालुक्यासह इतर तालुक्यातील प्रवासी त्रस्त झालेले असून, डिजीटल इंडिया ची संकल्पना असलेल्या भारतात आधुनिकीकरण तर सोडाच आहे तेही बंद होण्याच्या मार्गावर असून जेऊर रेल्वे स्टेशन आता असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती झालेली आहे.
सोलापूर रेल्वे विभागातील कुर्डुवाडी नंतर सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे आणि दळणवळण साठी सोयीस्कर असलेले जेऊर रेल्वे स्टेशन आता जेऊर परिसरातील नागरीकांसाठी अडचणीचे झालेले आहे, ना गाड्यांना थांबा मिळत आहे, ना रेल्वे बोर्ड जेऊरकरांच्या अडचणी समजून घेत आहे. जेऊर हे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असून जेऊर रेल्वे स्टेशनला करमाळा, इंदापूर, जामखेड, कर्जत, परांडा, भूम असे सहा तालुके जोडलेली असून या तालुक्यांसाठी जेऊर हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु मोजक्याच गाड्या जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढे मोठे दळणवळणाचे जाळं असताना जेऊर रेल्वे स्टेशनवर फक्त हैद्राबाद एक्सप्रेस, सिध्देश्वर एक्सप्रेस आणि चेन्नई मेल, इंद्रायणी एक्सप्रेस ह्या चार एक्सप्रेस गाड्या तर पुणे-सोलापूर डेमो एवढ्याच गाड्यांचा थांबा आहे. रेल्वे स्टेशनवर आणखी गाड्या थांबण्यासाठी विनंती केली असता आता गाड्या थांबाव्यात यासाठी निवेदन देण्यात यावे अशी अट रेल्वे कडून देण्यात येत आहे, आजपर्यंत कित्येक निवेदने दिली परंतु फायदा काहीच झालेला नाही.
सध्या जेऊर वरून पुण्याला जायचे झाले तर सकाळी 6.20 वाजता हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस आहे त्यानंतर नऊ तासांनी दुपारी 3.30 वाजता सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आहे तर तिथून नऊ तासांनी रात्री 11.30 ला चेन्नई-मुंबई एक्सप्रेस गाडी आहे म्हणजेच जवळजवळ नऊ तासांचे अंतर तीन गाड्यांमध्ये आहे. या व्यतिरिक्त एक ही रेल्वे गाडीचा थांबा जेऊर रेल्वे स्टेशनवर नसल्यामुळे येथील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जेऊरकरांच्या समस्या आणखीनच वाढलेल्या आहेत.याला पर्याय म्हणून हुतात्मा आणि दुपारची उद्यान एक्सप्रेसला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी होत आहे. ‘डिजीटल’ इंडिया या संकल्पनेत आजही निवेदनाद्वारे रेल्वे गाड्या थांबाव्यात यासाठी मागणी करणे म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे, रेल्वे बोर्डाने वरूनच सर्वे करून रेल्वे स्टेशन, गाव, लोकसंख्या, उत्पन्न ठरवून इतर रेल्वे गाड्यांना थांबा द्यायला पाहिजे, निवेदनाद्वारे गाड्या थांबण्यापेक्षा आहे ते रेल्वे स्टेशन बंद करावे अशी मागणी होत आहे.
