केम रेल्वे स्टेशनवर दोन गाड्यांना मिळाला कायमस्वरूपी थांबा तर जेऊरकरांवर अन्यायाची परंपरा कायम- कोणार्क एक्सप्रेस थांब्याची नुसती पेपरबाजी
जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशनवर दादर-पंढरपूर (11027/ 11028) आणि हैद्राबाद-मुंबई (22731/22732) या प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी थांबा देण्यात आलेला असल्याचे परिपत्रक रेल्वे बोर्डाने 9 जून रोजी काढल्याची माहिती मिळत असून जेऊर रेल्वे स्टेशनवर एकही गाडीचा थांबा न मिळाल्यामुळे प्रशासनाने आता जेऊरकरांवरचा अन्यायाची परंपरा कायम ठेवली आहे.
जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा ही अनेक वर्षांची मागणी आहे, मार्च महिन्यात यासाठी मोर्चाही काढण्यात आला होता, परंतु लोक प्रतिनिधी आणि प्रशासन याबाबत उदासीन आहे.
तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी तर कोणार्क एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा मिळाला असल्याची 23 मार्च 2023 रोजी डिजिटल मिडीयातून आणि पेपरबाजीतून केली होती. परंतु तीन महिने झाले तरी कोणार्क एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही, अन् यावर कुठलाही लोक प्रतिनिधी बोलायला तयार नाही.
एकंदरीत या सर्व गोष्टी लक्षात घेता जेऊरकरांवर अन्याय करण्याची परंपरा आजही कायम पहायला मिळत आहे.