माढा लोकसभा मतदारसंघतील रेल्वे स्टेशन्स होणार हायटेक ; तब्बल पंधरा कोटींचा निधी मंजूर- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

जेऊर रेल्वे स्टेशनचा अमृतभारत योजनेत समावेश

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
माढा लोकसभा मतदारसंघतील रेल्वे स्टेशन्स हायटेक होणार असून जेऊर रेल्वे स्टेशनचा अमृतभारत योजनेत समावेश होऊन यासाठी तब्बल १४.७३ कोटी रु. निधी मंजूर केला असलेची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, माढा मतदार संघातील शेती, सिंचन, रस्ते, नागरी सुविधा यासारखी विकासकामे करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून आपण कुर्डुवाडी व जेऊर रेल्वे स्टेशन येथे लोकांच्या सोईसाठी त्यांच्या मागणीप्रमाणे अनेक रेल्वे थांबे मंजूर केले आहेत यामुळे या भागातील प्रवाशी खूप समाधानी आहेत. लोकांना रेल्वेच्या सेवेचा अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी सोलापूर रेल्वे परिमंडळातील जिंती रोड, ढवळस, कुर्डूवाडी या रेल्वे स्टेशन परिसराच्या विकसासाठी तब्बल १४.७३ कोटी रु.निधी मंजूर केला आहे.
यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे.
हा निधी मंजूर झाल्याने लोकांना उच्च प्रतीच्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत याचे मनोमन समाधान आहे. या मंजूर निधीतून सदर रेल्वे स्टेशन परिसरातील परिभ्रमण क्षेत्र रस्ता, पार्किंग क्षेत्र, पथदिवे, लँडस्केपिंग आणि फलोत्पादन, बाग सजावट, प्रवेशद्वार आणि दरवाजे,दर्शनी भाग आणि उंची, शौचालय, 12 मीटर रुंद फूट-ओव्हर-ब्रिज, कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म सर्फेसिंग,स्टेशन इमारतीचे नूतनीकरण, जलवाहिनीची कामे, इलेक्ट्रिकल काम,साइनेज बोर्ड, एकात्मिक प्रवासी माहिती आणि सार्वजनिक घोषणा प्रणालीसह दूरसंचार प्रवासी सुविधा प्रवाशांना पुरवण्यात येणार आहेत.
आगामी काळात आपण रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी तत्पर राहणार आहोत असेही खा.निंबाळकर यांनी शेवटी सांगितले आहे.
एक खासदार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भूतो न भविष्यती चौफेर विकास कामाचा झंझावात संपूर्ण माढा मतदारसंघात अगदी थोड्या कालावधीत केला आहे.त्यामुळे लोक त्यांच्या कामावर खूष आहेत.
गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस भाजप



