जेऊरकरांचा जीवघेणा प्रवास थांबता थांबेना; हुतात्मा एक्स्प्रेस थांबणार तरी कधी?
तक्रारी, निवेदने दिल्यानंतरही प्रश्न कायम; प्रवाशांची होतेयं गैरसोय
जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
जेऊरकरांच्या मागण्या अजूनही पूर्ण होत नसून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झालेले, जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळता मिळेना झालेले असून रेल्वे बोर्डाने पुन्हा एकदा जेऊरकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, त्यामुळे करमाळा तालुक्यासह इतर तालुक्यातील प्रवासी त्रस्त झालेले असून, डिजीटल इंडिया ची संकल्पना असलेल्या भारतात आधुनिकीकरण तर सोडाच आहे तेही बंद होण्याच्या मार्गावर असून जेऊर रेल्वे स्टेशन आता असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती झालेली आहे.
जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी अनेकवेळा तक्रारी, निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.माढा तालुक्यातील खासदार वेळोवेळी प्रयत्न करत आहेतच परंतु यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील व्यापारिक दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक, व्यापारी, कामगार आणि प्रवाशांना न्याय देण्याची गरज आहे. ही एक्स्प्रेस गाडी येथे थांबत नसल्याने पुणे, दौंड, जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. हुतात्मा एक्स्प्रेस सध्या सोलापूरहून सुटते. पण जेऊरला आरक्षित तिकीट करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगत याठिकाणी थांबा मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे सांगितले. पण, दिवसेंदिवस प्रवासी वाढतच असताना, व आरक्षण ही वाढत आहे असे दिसून येते तरी पण प्रवाशी नाही, असे रेल्वेकडून कसे कायम सांगण्यात येते, त्यामुळे असा सवाल उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने पुन्हा हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा द्यावा आणि नंतर किती प्रवासी जेऊरहून प्रवास करतात, याची प्रचिती घ्यावी, अशी मागणी होत आहे. जेऊर येथे थांबणारी हैद्राबाद एक्स्प्रेस मध्ये असंख्य प्रवासी जेऊर स्थानकावरून चडतात व उतरतात, तसेच हैदराबाद मुंबई एक्सप्रेस या गाडीला स्लीपर कोच कमी केलेली असून 2 स्लीपर कोच सद्यस्थिती त आहेत त्यामुळे स्लीपर कोच चे गर्दी व जनरल डब्यांची गर्दी जेऊर स्थानकावर खूप प्रचंड आहे त्यामुळे प्रवासी एसी कोच मध्ये सुद्धा चढतात व दारामध्ये लटकून जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे त्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
या अशा प्रचंड गर्दीमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी प्रवासी संघटनेने ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तरीही प्रशासन यावर ठोस भूमिका घेत नाही, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे हाल होत आहेत, दरम्यान, प्रवासी संघटना, रेल्वे प्रवासी, नागरिक, आमदार, खासदार, रेल्वे प्रशासनाला विनंती तसेच तक्रारी करून, निवेदने देऊन, आंदोलनाचे इशारे देऊन जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण, रेल्वे प्रशासनास जाग आली नाही. जेऊर हे करमाळा, जामखेड, परांडा, या तालुक्यांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, त्याचा विकास अमृत भारत योजनेतून होत असून, एक्स्प्रेस गाड्या येथे थांबवाव्यात, यासाठी आंदोलन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
हुतात्मा इंटरसिटी थांब्यासाठी खासदारांनी केला होता पाठपुरावा
हुतात्मा एक्स्प्रेस थांबविण्यासह विविध अडचणींबाबत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोलापूर विभाग, मध्य रेल्वे व रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा वारंवार पाठपुरावा केला परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील प्रवाशांचे म्हणणे आहे. असंख्य ग्राहक, प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी वर्ग, पुणे, मुंबई कडे दररोज ये जा करतात.त्यामुळे जेऊरला हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा मिळणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.
सुहास सुर्यवंशी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना