जेऊर रेल्वे स्टेशनवर “अमृत भारत” अंतर्गत पार्सल सुविधा सुरू करा- प्रवासी संघटनेची मागणी

जेऊर, १९ (करमाळा-LIVE)-
जेऊर रेल्वे स्टेशनवर “अमृत भारत” अंतर्गत पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
सोलापूर विभागातील जेऊर रेल्वे स्टेशन हे ग्रामीण भागातील सर्वात व्यस्त व जास्त प्रवाशांची आवक-जावक असणारे स्थानक आहे, त्याचबरोबर या स्थानकाचे प्रवासी तिकीट विक्रीतून उत्पन्न ग्रामीण भागातून सर्वात चांगले आहे, या स्थानकाचा करमाळा-जामखेड-परंडा या तीन तालुक्यांची नागरिकांचा दाट संपर्क असल्याने या तालुक्यातील नागरिक हे जेऊर स्टेशन दळणवळण व प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातून सुलभ व सोयीचे असल्यामुळे येथून प्रवास करतात.
जेऊर स्टेशन वरून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांची, प्रवाशांची, व्यापाऱ्यांची व सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून जेऊर स्थानकावर पार्सल सुविधा ऑफिस चालू करण्यात यावे, जेणेकरून पार्सल ऑफिस चालू झाल्यास पंचक्रोशीतील तसेच वर नमूद केल्याप्रमाणे तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मासळी, शेळी, बकरी, कोंबड्या तसेच व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे सामान फ्रिज, टीव्ही, कुलर, टू व्हीलर, सायकल, तसेच विविध प्रकारचे छोटे-मोठे सामान व वस्तू सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड-मिरज-पंढरपूर-लातूर-दौंड-पुणे-लोणावळा-कल्याण-मुंबई अशा अनेक छोट्या-मोठ्या शहरांच्या ठिकाणी आपले सामान व वस्तू आणणे व पोहचविणे शक्य होईल त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळेल, समाजातील गोरगरीब व सामान्य जनतेला माफक दरात आपले सामान त्यांच्या नियोजित गावी किंवा शहर ठिकाणी नेहण्यासाठी मदत होईल व यामधून रेल्वे प्रशासनाचेही उत्पन्न वाढीस मदत होईल आणि सामान्य जनतेची सोय झाल्यास रेल्वे प्रशासनाचाही ग्रामीण भागातून सेवेच्या बाबतीत नावलौकिक वाढेल.
यावेळी जेऊर रेल्वे स्थानकावर पार्सल ऑफिस चालू करण्यासंदर्भात माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच सोलापूर प्रवासी संघ व जेऊर प्रवासी संघटना यांच्या वतीने जेऊर स्थानकाचे प्रबंधक मीना साहेब व निगुडकर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.