करमाळ्यात यशकल्याणी सेवाभवन येथे “कारगिल विजय दिवस’ समारंभाचे आयोजन

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
कारगिल विजय दिवस देशभर साजरा केला जातो याचे औचित्य साधत आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस या समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवत कारगिल युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय अभूतपूर्व आणि सर्व भारतीयाच्या अस्मितेला जागवणारा व अभिमानास्पद क्षण असून आपल्या शुर सैनिकांप्रती आदर व्यक्त करून बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे म्हणून दरवर्षी हा दिवस देशभरात विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात या राष्ट्रीय विजय समारंभाचे आयोजन केले जाते.
२६ वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयाचा आनंद आणि देशासाठी वीरगती झालेल्या व शहीद जवानांचे स्मरण करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो यावर्षी विजयाचे २६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या समारंभासाठी तालुक्यातील शहीद जवान परिवारातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व आजी-माजी सैनिक, सैनिक परिवार, व समस्त देशप्रेमी नागरिकांनी शूर वीरांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे आणि यशकल्याणी परिवाराच्या वतीने प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले आहे.