कौतुकास्पद! वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी करमाळ्याच्या ‘अनन्या’ ने केले कळसूबाई शिखर सर
करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
पुणे येथील जीवन शिक्षण फाउंडेशन आणि जेऊर येथील यशवंत क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून अनन्या जयेश पवार हिने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई शिखर सर करण्याचा विक्रम केला आहे.
कु. अनन्या ही इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनी असून ती कै. साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींची शाळा-1, करमाळा येथे शिकत असून तिने यापूर्वी देखील देवगिरी, प्रतापगड, शिवनेरी, वासोटा यासारखे किल्ले सर केलेले आहेत. कळसूबाई शिखर सर करताना नेहमीचा, सरधोपट बारी मार्गे असणारा मार्ग न वापरता पांजरे गावाच्या बाजूने डोंगर दऱ्यातून व घनदाट जंगलातून असलेल्या 13 किमी वाटेची निवड करून देखील अनन्याने हे आव्हान लिलया पेलले. त्याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.