करमाळा विधानसभा विकासाच्या मुद्द्यावरच लढणार – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा विकासाच्या मुद्द्यावरच लढविणार असल्याचे मत आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
२०१४ ला मी प्रथमतः करमाळा तालुक्यात आलो त्यावेळीची विधानसभा निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवली होती. २०१९ ला आपण आमदार झाल्यानंतर करमाळा तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले असून जवळपास ३ हजार कोटीची विकास कामे आपण तालुक्यात केली आहेत. त्यामुळे आपल्या कामावर करमाळा तालुक्यातील जनता समाधानी असून आगामी विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले.
काल करमाळा तहसील कार्यालयात त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. जयवंतराव जगताप भाऊ आणि मी एकत्रच आहोत .पाच वर्ष आम्ही एकत्रच काम केले आहे आणि भविष्यातही आम्ही एकत्रच राहू असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्याबरोबर चंद्रकांत सरडे, उद्धव माळी, विवेक येवले यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.