दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी एकास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
सदर प्रकरणी आरोपी अविनाश अंकुश देसाई यांचे तर्फे अॕड निखिल पाटील यांनी काम पाहिले.
करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी एकास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
या बाबत हकीकत अशी की, दिनांक 08/04/2024 रोजी तक्रारदार आरोग्यसेविका श्रीमती स्नेहल भगवान घोळवे यांनी लाचलुचपत विभाग सोलापूर यांना आरोपी अविनाश अंकुश देसाई (लिपिक प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग) व बाबासाहेब सुभाष माने (सहाय्यक लेखा अधिकारी पंचायत समिती बार्शी) हे वैद्यकीय बिलाचे मंजुरी करिता लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार दाखल केलेली होती.
सदर तक्रारीची पडताळणी करण्यासाठी दिनांक 08/04/2024 रोजी सापळा कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये आरोपी अविनाश अंकुश देसाई व बाबासाहेब सुभाष माने यांनी लाचेची मागणी करून सदरची रक्कम आरोपी नंबर तीन निखिल दत्तात्रय मांजरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी यांच्याकडे देण्यास सांगितली होती व यातील आरोपी बाबासाहेब सुभाष माने व निखिल दत्तात्रय मांजरे यांना दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
सदर कारवाई दरम्यान यातील आरोपी अविनाश अंकुश देसाई फरार झाला होता. तदनंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळणे कामी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालय येथे धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री जे.सी.जगदाळे यांच्यासमोर झाली सदर जामीन अर्जाचे युक्तीवादावेळी आरोपी अविनाश अंकुश देसाई यांचे वकील अॕड निखिल पाटील यांनी यातील तक्रारदाराचे कोणतेही काम अविनाश अंकुश यांचेकडे प्रलंबित नव्हते तसेच त्यांनी स्वतः करिता लाचेची मागणी केलेली नसून कलम 7 व 7 (a) सदर आरोपी विरुद्ध लागू होणार नाही तसेच त्यास खोटेपणाने सदर केस मध्ये गुंतवण्यात आल्याचे व सदर आरोपीकडून काहीही जप्त करावयाचे नसून सदर केसचा तपास सर्व पंचनामे पूर्ण झालेले असून यातील आरोपी हा आवाजाचे नमुने एसीबी ऑफिस सोलापूर यांना देण्यास तयार असल्याबाबतचा युक्तिवाद केला.
तसेच उच्च न्यायालयाचे त्यासंदर्भातील निवाडे सादर केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस तपासकार्यात मदत करण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपी अविनाश अंकुश देसाई यांचे तर्फे अॕड निखिल पाटील यांनी काम पाहिले.