17/12/2024

करमाळा तालुक्यातील निसर्ग रम्य परिसरातील दहिगावं येथील शेळके वस्ती शाळेत विविध कार्यक्रम संपन्न

0
IMG-20230917-WA0008.jpg

चिखलठाण, दि. 17 (करमाळा-LIVE)-
जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ ज्ञानदानाचे केंद्र न होता ती सुसंस्करीत विद्यार्थी घडवणारी मंदिरे व्हावीत असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा गणेश करे-पाटील यांनी दहिगाव येथील शेळके वस्ती शाळेत वृक्षारोपण, पाणी फिल्टर कक्षाचे उद्घाटन व स्मार्ट टीव्ही प्रदान कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील होते. पुढे बोलताना करे-पाटील म्हणाले की, प्राथमिक शाळेत केवळ शिक्षण देण्याचे कार्य होत नसते तर एक चांगला माणूस घडवण्याचा पाया तयार होत असतो. त्यामुळे योग्य वेळी जर चांगले संस्कार झाले तर अशा विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असते करमाळा तालुक्यातील निसर्ग रम्य परिसरातील शेळके वस्ती शाळेत आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा आशा असू शकतात यावर विश्वास बसत नाही. खरोखरच या शाळेला नावारूपाला आणण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने या शाळेसाठी दोन स्मार्ट टीव्ही प्रदान सोहळ्याबरोबरच वृक्षारोपन, पंचायत समितीच्या माध्यमातून पाणी फिल्टर प्लॅंटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वरी गोडसे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक विजय राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फोजमल पाखरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक दस्तगीर शेख यांनी मानले.

अध्यक्षपदावरून बोलताना माजी सभापती अतुल पाटील यांनी लहान मुलांकडून पालकांनी अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत त्यांच्या बालमनावर कोणत्याही प्रकारचे दडपण आले नाही पाहिजे मात्र स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना वेळोवेळी बक्षीसरुपी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, सरपंच प्रियांका गलांडे, उपसरपंच आप्पासाहेब लोखंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कोंडलकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हरीचंद्र शेळके, केंद्रप्रमुख वंदना पांडव, भारत पांडव, माजी सरपंच संजय गलांडे, बापूराव लोखंडे, नानासाहेब साळुंखे, विजय लबडे, महावीर निंबाळकर, सचिन लोखंडे, आबासाहेब गोडसे, पल्लवी गलांडे यांच्यासह ग्रामस्थ शिक्षणप्रेमी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page