‘पवनपुत्र’ मुळे पंचवीस वर्षांची मैत्री आजही कायम- अॕड अजित विघ्ने
करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
पश्चिम विभागाचे युवानेते तसेच सामाजिक कार्यकर्ते अॕड अजित विघ्ने यांनी साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक पत्रकार दिनेश मडके यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले असून मनोगत पुढीलप्रमाणे त्यांच्या लेखणीतून.
आमचे पत्रकार मित्र, साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक आणि डिजिटल मिडीया क्षेत्रात देखिल अतिशय तत्परतेने कार्यरत असणारे तसेच सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात देखिल काम करणारे माननीय श्री. दिनेशराव मडके यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
खरं तर मला अनेक दिवसांपासून माझ्या या मित्राविषयी लिहायचे होते. गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमची मैत्री असून, पवनपुत्र मुळेच आमची आणि त्यांची मैत्री झाली. पूर्वी आम्ही शिवसेनेचे नेते अॕड शिवाजीराव मांगले साहेब यांचे संपर्कात असायचो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी दिनेशराव मडके नावाचा हा तरुण स्वतः चे पवनपुत्र साप्ताहीक करमाळ्यात घरोघर वाटायचा. त्या काळी हिरडे साहेबांच्या साप्ताहिक संदेश नी बरीच आघाडी घेतली होती. चिवटे यांचे बनशंकरी तसेच येवले व इतर अनेकांची साप्ताहीके त्या काळी असायची. पत्रकारिता क्षेत्रात देखिल काम करणारी अनेक दिगज्ज मंडळी करमाळा तालुक्यातील राजकारण, समाजकारण ढवळून काढण्याचे काम करत होती. त्या काळी आम्ही करमाळ्याच्या एसटी स्टॅण्ड वर असणारे सुनील सुर्यपुजारी यांचे पेपर स्टॉल वरून सकाळ, सामना, संचार, तरुण भारत, केसरी, संध्यानंद सारखी चार चार वृत्तपत्रे आणि साप्ताहीके आणि मासिके, दिवाळी अंक वाचण्यासाठी आणि शब्द कोडी सोडविण्या साठी घेऊन जात असायचो. आज मिडीयाने आधुनिक रूप धारण केलेले असून पेपर वाचकांची संख्या दिवसें दिवस कमी होत आहे. त्या काळी एखादे साप्ताहीक काढणे आणि चालविणे आणि त्यात सातत्य ठेवणे इतके सोपे काम नव्हते. अशातही अगदी तरुण वयात या मित्राने स्वतःचे पवनपुत्र साप्ताहीक विकसित केले. दारोदार जाऊन वाचक तयार केले. साप्ताहिक छापाई करायला देखील पैसे नसताना एक एक पायरी चढत चढत आज त्यांनी पवनपुत्र ला आधुनिक काळात ही जीवंत ठेवले आहे. आजही पवनपुत्र साप्ताहीक, दिवाळी अंक, कॅलेंडर आणि डिजिटल मिडीया (पोर्टल) द्वारे कार्यरत आहे. याचे सर्व श्रेय आणि कष्ट श्री. दिनेश उद्धवराव मडकें यांना आहे. स्वतःचे साप्ताहीक सांभाळत त्यांनी सामाजिक बांधिलकी देखिल नेहमीच जपली आहे. मुळातच स्वाभिमानी असणाऱ्या या मित्रानी कुणाचे ताटाखालचे मांजर होऊन जगण्यापेक्षा आपली स्वतःची वाट निवडुन स्वाभिमानी पत्रकारीतेच्या जोरावर काम करून जीवाभावाची माणसे देखिल कमावली आहेत. फक्त पैसा हेच जगण्याचे माध्यम असू शकत नाही हे त्यांनी सिद्ध केलयं. कोरोना काळात त्यांचे कुटुंबावर अनेक संकटे आली, वडील आणि बहीणीचे निधन, आईला पॅरालिसीस, पत्नीला कोरोना अशाही संकटात हा माणूस डगमगला नाही आणि त्यावर यशस्वी मात केली. स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणीज यांचे ते अनुयायी असुन सत्संगाचे माध्यमातुन त्यांनी अनेकांना मार्गदर्शक म्हणुनही नावलौकीक केलेला आहे. पत्रकार बंधु साठी काम करताना त्यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना सर्व पत्रकारांचा विमा उतरविणे, कोविड काळात पत्रकार व अनेक घटकांना शिधा वाटप करणे, औषधे व धान्य वाटप करण्याचे देखिल कार्य केलेले आहे. सध्या ते डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष पदाची धुरा गुरुवर्य राजा मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सांभाळत आहेत. करमाळा, गौरव महाराष्ट्राचा, स्व दिगंबरराव बागल आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार, डिजीटल मिडीया पत्रकार संघाचा पुरस्कार, दैनिक लोकमत, दैनिक पुण्यनगरी, तरुण भारत करीता देखिल त्यांनी काही काळ पत्रकारिता केलेली आहे. आजही ते दैनिक जनसत्य, संवाद तरुण भारत करीता तालुका प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने चालु केलेला हा पवनपुत्र चा प्रवास आज इलेक्ट्रानिक मिडीया क्षेत्रातही पोर्टल च्या माध्यमातून तत्पर सेवा देत आहे. आपल्या परखड लिखानाने ते प्रसिद्ध असून, अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखिल संघर्षातून व कष्टातुन त्यांनी पवनपुत्र नाव काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवले आहे. सर्व राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी सलोख्याचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले असून, कष्टातून प्रगती केली आहे. करमाळा तालुक्यातील बारिक सारीक गोष्टींची माहीती मिळवुन त्याला प्रसिद्धी देण्याचे त्यांचे काम वाखाणण्या सारखे आहे. एवढ्या धावपळीत देखील कोणावरही न चिडता ते कार्यमग्न रहातात त्याचे नेहमीच कौतुक वाटते. सामाजिक उपक्रमा बरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही ते अग्रेसर असतात. आज त्यांची पत्रकार ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पर्यंत ची वाटचाल पाहता नक्कीच आनंद वाटतो . माझ्या सानिध्यात असलेल्या अनेक महनीय व्यक्ति विषयी मी लिहीले परंतु या पत्रकार मित्राविषयी लिहीताना जरा उशीर झाला परंतु त्यांना आज मानवाधिकार संघटनेने महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे त्यांचे विषयी दोन शब्द लिहिण्याचे भाग्य मिळाले. त्यांना त्यांचे भावी वाटचालीस अध्यात्मिक कार्यास हार्दिक शुभेच्छा!
ॲड अजित विघ्ने, केत्तुर