17/12/2024

सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करा- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

0
IMG_20220801_131001-4-1.jpg

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी असून गरीबांना गरजेच्या अशा सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करा अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, कोरोना कालावधी अगोदर गरीबांना प्रवास करण्याची सोय म्हणून अनेक पॅसेंजर गाड्या तसेच मध्यमवर्गीय प्रवाशासही तिकीट खर्च परवडेल अशा एक्सप्रेस गाड्या चालू होत्या. परंतु अलीकडील काही महिन्यांपासून ह्यातील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकावरील थांबे काढून टाकण्यात आले आहेत. ज्या गाड्या धावत आहेत त्यांचे जनरलचे डब्बे कमी करुन एसी डब्बे वाढवण्यात आले आहेत. यामुळे आता गरीब प्रवाशास रेल्वे प्रवास करणे अशक्य झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजापुर-मुंबई पॅसेंजर, पंढरपूर-शिर्डी एक्सप्रेस यासह काही गाड्या बंद करण्यात आल्या.

वास्तविक पाहता पंढरपूर तीर्थक्षेत्राची दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ तसेच सोलापूर शहरानजीक श्रीक्षेत्र तुळजापूर येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. अनेक मोठ्या शहरातुन व अनेक राज्यातून भाविकभक्तगण येथे दर्शनासाठी येतात. पाठीमागील काळात रेल्वे हे या प्रवाशांचे दळणवळणाचे प्रमुख साधन होते. यामुळे सोलापूर जिल्ह्यातीतुन धावणाऱ्या सर्व फास्ट पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरु कराव्यात. तसेच या गाड्यासाठी व सध्या धावत असलेल्या गाड्यासाठी रेल्वे वेळापत्रकातून वगळलेल्या पुर्वी मान्यता असलेल्या सर्व रेल्वे स्टेशनसाठी थांबा देण्याचे नियोजन केले जावे. सोलापूर -पुणे-मुंबई या दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी. सोलापूर जिल्ह्यातील व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन कृषी यावर सदर रेल्वे बंद असल्याने परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार, रुग्ण, महिला,शेतकरी आदि सर्व घटकांची दळणवळण गैरसोय टाळण्यासाठी पुर्वीच्या रेल्वे गाड्या तातडीने सुरु करण्यात याव्यात अशी मागणी आपण या निवेदनातून केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

तसेच या निवेदनाची प्रत रेल्वे बोर्डाचे सीईओ अनिलकुमार लाहोटी यांनाही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page