जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबा द्या ; रेल्वेच्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची चर्चा

जेऊर, दि. २७ (करमाळा-LIVE)-
मागच्या आठवड्यात बुधवारी सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यालयाच्या सभागृहामध्ये जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या विविध मागण्या व सूचनाच्या संदर्भात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, केमचे माजीं सरपंच अजित तळेकर, प्रवासी संघटना सोलापूरचे अध्यक्ष संजय पाटील, जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, प्रवीण करे, तात्यासाहेब कळसाईत, अल्लाउद्दीन मुलाणी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर डिव्हिजन येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध स्थानकांचे रेल्वे संदर्भातील अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती.
यावेळी आयोजित बैठकीमध्ये विविध रेल्वे स्थानकावरील अडीअडचणी व समस्या सोडवण्याचे संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कुर्डूवाडी, जेऊर, केम, मोडनिंब, वाशिंबे या स्थानकाच्या विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी चर्चा सकारात्मक झाली. जेऊर स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी व उद्यान एक्सप्रेस संदर्भात रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे असे चर्चेतून दिसून आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरच वरिष्ठ कार्यालयाला ला यासंदर्भात प्रस्ताव पाठवून देऊ असे आश्वासन दिले. या बैठकीत हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना जेऊर येथे थांबा देणे संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. जेऊर रेल्वे स्थानकावर लवकरच केळी लोडिंग करण्यासाठी किसान रेल्वे चालू करण्याच्या मागणीवर लवकरच जेऊर रेल्वे स्थानकावरून केळी लोडिंग होणार असल्याची तजवीज रेल्वे प्रशासना तर्फे करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
सिध्देश्वर एक्सप्रेसच्या वेळेत बदल करावा-
जेऊर रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेस ही रात्री मुंबईकडे जाताना १२.०२ मिनिटांनी येते. त्यामुळे येथील रिझर्वेशन ची तारीख बदलते. त्यामुळे बऱ्याच प्रवाशां मध्ये संभ्रम निर्माण होतो.आदल्या दिवशीच रिझर्वेशन निघून जाते. त्यामुळे आपण रेल्वे प्रशासनाकडे विनंती केली होती की हा टाइमिंग दोन मिनिटांनी कमी करून रात्री बाराच्या आत डिपार्चर करण्यात यावे. त्यामुळे त्याच दिवशीची रिझर्वेशनची तारीख पडेल व प्रवाशां मध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीवर गंभीरपणे विचार झाला असून ती मागणी मान्य करून रेल्वे प्रशासनाने त्यांनी ती मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे.
तसेच सोलापूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनीही प्रभावीपणे हुतात्मा इंटरसिटी या गाडीला माढा व जेऊर या स्थानकावर थांबा देण्याची मागणी संदर्भात सकारात्मक बाजु मांडली. त्याला रेल्वे प्रशासनाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी केम चे माजी सरपंच अजित तळेकर, महिंद्र पाटील, सोलापूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, जेऊरचे अल्लाउद्दीन मुलाणी, सुनील अवसरे, तात्यासाहेब कळसाईत, जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, सोलापूर डिव्हिजन रेल्वेचे सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते.
हुतात्मा, इंटरसिटी या गाडीला जेऊर व माढा स्थानकावर थांबा देण्यात यावा. तसेच केम रेल्वे स्थानकावर चेन्नई एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा. किसान रेल्वेचे द्राक्षे व केळी लोडिंग केम रेल्वे स्थानकावरून करण्यात यावे जेणेकरून सर्व प्रवासी तसेच शेतकरी वर्गांना याचा लाभ घेणे सोयीचे होईल.
सुहास सूर्यवंशी, अध्यक्ष- प्रवासी संघटनेचे,जेऊर