08/06/2025

कुंभेजच्या बागल विद्यालयातील मुला-मुलींची अनोखी प्रतिज्ञा ; विद्यालयात सखी सावित्री समितीची स्थापना

0
IMG-20240829-WA0013.jpg

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात स्त्री-सुरक्षा उपक्रमांतर्गत महिला समुपदेशक रूपाली कन्हेरे यांनी मुलींची सुरक्षितता या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी मुला-मुलींनी अनोखी प्रतिज्ञा घेतली.

मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व धनराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समुपदेशक रूपाली कन्हेरे यांनी स्त्रीशक्तीचा अविष्कार, स्त्रीयांचे- मुलींचे समाजातील स्थान, आजचे भीषण वास्तव, आपली व्ययस्थाने व बलस्थाने तसेच सर्वसमावेशक दृष्टीकोन या विषयी माहिती दिली. यानंतर त्यांनी मुलींना सुरक्षाविषयक प्रतिज्ञा दिली.

मुलींनी पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा केली-
“समाजातील चांगुलपणावर माझा विश्वास आहेच परंतू मी कोणावरही अंध विश्वास ठेवणार नाही. मी स्वतःच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देईन. तसेच मला किंवा अन्य कोणत्याही मुलीस शाळेत, रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अथवा मानसिक त्रास झाल्यास मी न घाबरता आई वडिलांना, पालकांना, शिक्षकांना मनमोकळेपणाने सांगेन अशी प्रतिज्ञा करीत आहे. “

मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले की, शाळा हे समाजाचे प्रतिबिंब असल्याने समाजमनाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर होत असतो त्यामुळे विद्यार्थी विकसनासाठी मुल्याधारीत समाज तयार होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी शाळा व समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सर्वांच्या सहकार्याने शाळेची यशस्वी वाटचाल सुरु असून यापुढील काळात समाजातील सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सलोख्यासाठी विद्यालय विशेष प्रयत्नशिल राहील असे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य सेविका अनिता कंठाळे यांनी शालेय मुलींच्या सर्वसामान्य आरोग्यविषयक समस्या, त्या बाबत द्यावयाची दक्षता तसेच त्यावरील उपाय याबाबत चर्चात्मक व्याख्यान दिले. यावेळी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्यासह धनराज भोसले, सहशिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, रूपाली कन्हेरे-थोरे, आरोग्य अधिकारी सौ कंठाळे, सुजाता कांबळे, रेश्मा पठाण, आरती घोरपडे, युवराज कादगे, सुमित काटे, बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे उपस्थित होते.

सहशिक्षक कल्याणराव साळुंके यांनी मुलांची स्त्री-सूरक्षा विषयक पुढील प्रतिज्ञा घेतली-
“मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी शाळेतील तसेच अन्य मुली व महिला यांचा मनापासून आदर करीन. मुली व महिलांची कोणत्याही प्रकारे शारीरक व मानसिक हिंसा होणार नाही याची काळजी घेईन व इतरांनाही या साठी प्रवृत्त करीन. त्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देईन. अशी प्रतिज्ञा करीत आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम बनसोडे यांनी केले तर संतोष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page