कुंभेजच्या बागल विद्यालयात व्यसनमुक्तीचा संदेश देणारी होळी ; काडीपेटी मुक्त परिसर करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ



करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
कुंभेजच्या दिगंबरराव बागल विद्यालयात व्यसनमुक्तीचा संदेश देणारी होळी साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी काडीपेटी मुक्त परिसर करण्याची शपथ घेतली तर शेतकऱ्यांचेही प्रबोधन करणार असल्याचे प्रतिज्ञा घेतली.
नेहमीच पर्यावरणस्नेही उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालय पारंपारिक सण समारंभ साजरे करत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी सातत्याने अभिनव उपक्रम राबवत असते. पारंपारिक महत्व असणारा होळी सणास व्यसनमुक्तीचा संदेश देणारी होळी ही संकल्पना राबवण्यात आली. यावेळी पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
या होळी सणाचे औचित्य साधत तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराने व व्यसनाचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम ओळखून याबाबत जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने विद्यालयामध्ये प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
सार्वजनिक होळीमध्ये मोठया प्रमाणावर लाकडे जाळली जातात. दोन दोन दिवस ती होळी पेटलेली असते. त्यासाठी मोठी वृक्षतोड होते. निसर्गाची हानी होते. ती होऊ नये यासाठी परिसरामध्ये या बाबत जाणिव जागृती केली. कचरा पेटवून देण्यापेक्षा तो नैसर्गिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी.
काडीपेटीमुक्त परिसर केल्यास होणारे प्रदुषण रोखता येऊ शकते म्हणून ‘खेलो होली इको फ्रेंडली ‘ ही थीम राबवण्यात आली. व त्यानुसार सणाचे आधी ही प्रतिकात्मक होळी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील, पर्यावरण शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, सेवक बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे उपस्थित होते.
कुंभेजचे बागल विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी सर्व विचारांच्या ग्रामस्थांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी सतत प्रयन्नशिल असते. संस्था व ग्रामस्थांची उत्तम साथ लाभल्यामुळे विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. कुंभेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेला आमचे वडिल स्व. किसन तात्या मुटके यांचे स्मरणार्थ यापूर्वी एक लाख रुपयांची मदत दिलेली आहे. यापुढेही चांगल्या व्यक्ती व सामाजिक संस्थाकडून शाळेला मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार आहोत.
अॕड. बाळासाहेब किसनराव मुटके, कर सल्लागार, मुंबई
बागल विद्यालय हे गुणवत्तेसह निसर्गपूरक उपक्रम राबवत असल्यामुळे संस्कारक्षम विद्यार्थी भविष्यात जबाबदार नागरिक होऊन सामाजिक बांधिलकीची जोपासना करतील.
हनुमंत पाटील, मुख्याध्यापक


