महात्मा गांधी इंग्लिश मिडियम स्कूलचे नामकरण ; ‘नाम- साधना’ मॉडर्न इंग्लिश स्कूल नावाने यावर्षीचे वर्ग भरणार- ‘कॉफी विथ पॕरेंट्स’ उपक्रमही सुरू

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
नवीन शैक्षणिक धोरण ‘नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी २०२० ‘च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली पासून नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचा भाग म्हणून या ‘नामसाधना मॉडर्न इंग्लिश स्कूल ‘मध्ये मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा व आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर चर्चा करण्यासाठी पालक, शिक्षक व संस्था प्रतिनिधी यांची ‘कॉपी विथ पॕरेंट्स ‘ही थीम समोर ठेवून ‘शिक्षक -पालक सभा’ खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप हे होते. यावेळी व्यासपीठावर महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक व इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य बी के पाटील, उपप्राचार्य अनिस बागवान पर्यवेक्षक रमेश भोसले, प्रा.भागडे, प्रा.शरद जाधव, इंग्लिश मीडियम स्कूलचा सर्व टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ तसेच पालक बंधू -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासभेची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. पालक सभेचे प्रास्ताविक सौ. वायकर यांनी केले. या पालक सभेत श्रीहरी भोगल, सौ. माकुडे, सौ. गायकवाड, श्री. देवकर, श्री.बोरुडे, सौ. चोपडे, सौ. खेडकर, श्री बागवान, श्री. गुटाळ, श्री.अडसूळ आदी पालकांनी विचार व्यक्त केले व स्कूलच्या कामकाजाबाबत व पाल्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून काही सूचना मांडल्या.
यावेळी उपप्राचार्य अनिस बागवान, प्राचार्य बाळकृष्ण पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. युवा नेते तथा संस्था विश्वस्त शंभूराजे जगताप यांनी अध्यक्षीय भाषणातून या स्कूलला सर्वतोपरी मदत करून तालुक्यातील एक मॉडर्न स्कूल म्हणून नावलौकीक मिळवण्याचा आपला मानस आहे असा निर्धार व्यक्त केला.
संस्थाध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या स्कूल साठी लवकरच नवीन प्रशस्त इमारत, स्कूल बस, डिजिटल क्लास रूम्स इत्यादी भौतिक सुविधांसह संस्कृत सारखा विषय उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी बोलताना दिले.
तसेच उन्हाळी शिबिरांतर्गत घोडेस्वारी, स्विमिंग, बुद्धिबळ, कराटे व इतर क्रीडा प्रकार इत्यादी उपक्रम राबवण्याबाबतही त्यांनी शब्द दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्व पावले संस्था प्रतिनिधी म्हणून आपण उचलू असेही ते म्हणाले.
यावेळी ॲक्टिव पॕरेंट्स म्हणून श्रीहरी भोगल, गणेश गुटाळ, शितल माकुडे, सारिका धायतोंडे, प्रियंका नलवडे या पालकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात यथोचित सन्मान करण्यात आला.
या सभेदरम्यान सर्वांनी कॉफीचा मनमुराद आनंद घेतला. या सभेचे आभार स्कूलच्या सहशिक्षिका कोरडे मॅडम यांनी मानले.