करमाळा एमआयडीसी पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट प्रस्ताव दाखल ; जवळपास साडेतीन कोटी रुपये होणार खर्च- महेश चिवटे यांची माहिती
करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा एमआयडीसीत उद्योग येण्यासाठी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा व प्राथमिक गरजा पूर्ण कराव्यात अशी मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. श्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार आज औद्योगिक विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, सांगली येथील कार्यकारी अभियंता नाईक साहेब, सोलापूर येथील अभियंता अशोकराव मगर या अधिकाऱ्यांनी आज करमाळ्यात येऊन करमाळा एमआयडीसीची पाहणी करून प्रलंबित कामावर चर्चा केली.
यावेळी पाच लाख लिटर पाण्याचा स्टोर टॅंक तसेच अडीच लाख लिटर पाण्याची टाकी चार इंची संपूर्ण परिसरात पाईपलाईन
संपूर्ण एमआयडीसी क्षेत्रात स्ट्रीट लाईट याचा प्रस्ताव तयार करून पुणे कार्यालय मार्फत मुंबई कार्यालयात पाठवण्यात येणार आहे.
नवीन उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी पाणी व लाईट तात्काळ उपलब्ध करण्याचे आदेश उद्योग मंत्री सामंत यांनी दिल्यामुळे करमाळा एमआयडीसीच्या कामाला आता गती मिळणार आहे. त्याचप्रमाणे करमाळा नगरपालिके च्या अमृत टू अमृत या नवीन पाणीपुरवठा योजनेतून प्रतिदिन एक लाख लिटर पाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.येत्या महिन्याभरात या कामाला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार आज करमाळा एमआयडीसीतील प्रलंबित कामाची पाहणी केली असून पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट प्रस्ताव पूर्ण करण्यात आले आहे
सुधीर नागे,
कार्यकारी अभियंता औद्योगिक विकास महामंडळ पुणे
करमाळा एमआयडीसी मध्ये किमान दोन हजार तरुणांना काम देईल असा मोठा उद्योग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मंत्री उदय सामंत त्यांच्याकडे करण्यात आली आहे त्यांनी याला सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे लवकरच या बाबतीत मुंबईत बैठक होणार आहे.
महेश चिवटे जिल्हाप्रमुख सोलापूर