नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी मनातील इच्छे पेक्षा करमाळ्यातील गंभीर प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे- भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
सध्या करमाळ्यातील जनता पाणी, रस्ते, कचरा, अतिक्रमण, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे यांच्यासारख्या गंभीर प्रश्नांना तोंड देत आहे ह्या समस्यांकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी अगोदर लक्ष द्यावे असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार यांनी सांगितले आहे.
काल एका जाहीर कार्यक्रमात मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी त्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असल्याचे बोलून दाखविले.
आमची त्यांना विनंती आहे की, आपण एक प्रशासकीय जबाबदार अधिकारी आहात. सध्या करमाळ्यातील जनता पाणी, रस्ते, कचरा, अतिक्रमण, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे यांच्यासारख्या गंभीर प्रश्नांना तोंड देत आहे. त्यांनी शहरातील समस्यांवर लक्ष द्यावे. तसेच तालुक्यात किंमत नसलेल्या स्वयंघोषित नेत्याच्या ताटाखालचे मांजर होऊन विशिष्ट भागातील अतिक्रमण वर लक्ष देण्यापेक्षा त्यांच्यात हिंमत असेल तर शहरातील सर्व अतिक्रमण काढून नागरिकांना मोकळा श्वास घेऊन द्यावा.
करमाळ्यात आतापर्यंत आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वात निष्क्रिय अधिकारी सचिन तपासे आहेत. त्याच्यामुळे अनेक गंभीर प्रश्न तयार झाले आहे.
त्यांना मनातील मुख्यमंत्री मनासारखा पाहिजे असेल तर त्यांनी शासकीय नोकरी सोडून राजकारत यावे.त्यांनी त्यांच्या मनातल्या इच्छा व्यक्त करण्यापेक्षा जनतेच्या मनातील इच्छा समजून घेऊन काम करावे.
भारतीय जनता पार्टी च्या पारड्यात भरभरून यश टाकून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जनतेने मुख्यमंत्री केले आहे.त्यामुळे तपासे च्या मनातल्या इच्छेला काही किंमत नाही,असे मत भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार यांनी व्यक्त केले.