करमाळा शहरातील व्यापाऱ्याला दिवसढवळ्या 28 हजार रुपयांना गंडा
करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरातील गुजर गल्ली येथे दुचाकीवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी भामट्यांनी पाचशे रुपये बंदे मागण्याचा बहाणा करून वृद्ध दुकानदाराचे २८ हजार रुपये लांबवले आहेत.
काल सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती देताना नरेश शहा (रा. दत्त पेठ, करमाळा) यांनी सांगितले आहे की, सोमवारी सकाळी माझे वडील भगवानदास शहा हे नेहमीप्रमाणे गुजर गल्ली येथील बारदाना व शेतीविषयक वस्तू विक्रीचे दुकान उघडून बसले असताना जय महाराष्ट्र चौकाकडून आलेल्या हेल्मेट धारी इसमाने शंभरच्या पाच नोटा देऊन पाचशेची बंदी नोट देण्याची विनंती केली. या शंभरच्या नोटा घेऊन भगवानदास यांनी दुकानातील गल्ल्यात बँकेत भरण्यासाठी ठेवलेल्या २८ हजार रुपयांतून एक पाचशेची नोट या इसमाला देऊ केली. परंतु सदर नोट बदलून देण्याची मागणी करत या भामट्याने वडील भगवानदास यांना बोलण्यात गुंतवून गल्ल्यात ठेवलेले २८ हजार रुपये लांबवले आहेत.
याबाबत करमाळा पोलिसात नरेश भगवानदास शहा यांनी तक्रार दिली असून करमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.