पुनवर येथील शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं फेडले पांग ; राहुल धनावडे याची नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी पदी निवड


करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पुनवर येथील शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं पांग फेडले असून राहुल धनावडे याची महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी पदी निवड झाली आहे. या परीक्षेत त्याला २०० पैकी १९२ मार्क मिळालेले असून त्याची ४१ वी रँक आहे.
पुनवर येथील राहुल गजेंद्र धनावडे यांची महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी पदी निवड झाली आहे. राहुलच्या बालपणीच पितृछत्र हरपले त्यामुळे घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य आले होते दोन मुले व दोन मुली असा संपूर्ण संसार त्याच्या आईने शेतमजुरी करून उभा केला त्यांना चांगले शिक्षण दिले हे सर्व केवळ शेतमजुरी करूनच कारण स्वतःची एक तुकडा ही जमीन नसल्याने दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
आर्थिक परिस्थिती हलकीची असल्याने राहुलने सर्व शिक्षण नातेवाईक व कर्जत शहरात राहून पूर्ण केले.
दादा पाटील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला व पदवीनंतर त्याने अधिकारी होण्याचे ठरविले आणि कर्जत शहरातच राहून एम पी एस सी ला सुरुवात केली. काही काळानंतर तो राहुरी या ठिकाणी गेला तिथेही त्यांनी स्पर्धा परीक्षेचा भरपूर अभ्यास केला. अनेक परीक्षा त्याने दिल्या परंतु सतत अपयश आले गेले आठ-नऊ वर्षे तो संघर्ष करत होता. त्याने संयम ठेवत त्याचे ध्येय पूर्ण केले.
त्याच्या संघर्ष मातेची, नातेवाईकांची मित्रांची त्याला चांगली साथ मिळाली. त्याचे प्रामाणिक कष्ट करण्याची जिद्द, सातत्य, आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची अडचण आली नाही. अपयशाने खचून न जाता तो कायम संघर्ष करत उभा राहिला, म्हणूनच आज त्याचा सोन्याचा दिवस उजाडला.
खऱ्या अर्थाने आज त्याचं व त्याच्या आईने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. हा खडतर प्रवास गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी जवळून अनुभवला आहे त्यामुळे त्याचे व त्याच्या परिवाराचे पंचक्रोशी मध्ये खूप कौतुक होत आहे. आणि पुनवर सारख्या मजुरी करणाऱ्या गावातील मजूर आईचा मुलगा अधिकारी झाला याचा संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे. या माध्यमातून त्याने गावातील युवकांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.



