अंतरवाली-सराटी : करमाळ्यातून मराठा समाजाच्या वतीने शंभूराजे जगताप यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता ?

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
युवानेते शंभूराजे जगताप विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जूना गट म्हणून जगताप गटाची ओळख आहे.
देशभक्त स्वर्गीय नामदेवराव जगताप व स्वर्गीय पांडुरंग आण्णा जगताप यांच्या माध्यमातून जगताप गट स्वातंत्र्यपुर्व काळापासून आजपर्यंत करमाळा तालुक्यातील राजकारण व समाजकारणात केंद्रस्थानी राहीला आहे. हा गट फक्त तालुक्यापूरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकारणात सुद्धा आपला दबदबा निर्माण करण्यात मागे राहीला नाही.
आमदारकीच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य परिवहन मंडळ सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, राज्य सहकारी बाजार संघ संचालक आदी पदांना जगताप गटाने गवसणी घातली आहे.
जगताप गट हा १९३६ पासून अठरापगड जातींचा, सर्वधर्म समभाव मानणारा युवकवर्ग ते बुजूर्ग जेष्ठांचा सदैव जनतेची सेवा करणारा गट आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व राजकिय पदांवरती जगताप गटाचे प्रतिनिधी नेतृत्व करत आहेत. स्वर्गीय नामदेवराव जगताप यांनी तालुक्याचे स्वतः पाच टर्म व आरक्षण काळात कार्यकर्ते दोन टर्म असे नेतृत्व केले आहे तसेच त्यांच्या निधनानंतर जयवंतराव जगताप यांनी १९९० साली अपक्ष एक टर्म व शिवसेना पक्षातून एक टर्म असे दहा वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहे.
त्यांचे धाकटे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी शैक्षणिक वाटचाल चालू असताना २०१८ साली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी पासून राजकिय वाटचालीला सुरुवात केली. सत्ता स्थापनेवेळी राजकीय कुरघोड्यांमुळे ५६ दिवस कारावास भोगला असून त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २०१९ विधानसभा व लोकसभा निवडणुकीत तसेच दरम्यान च्या काळातील तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या व सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीत , २०२३ साली झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व खरेदी -विक्री संघाच्या निवडणूकीत विशेष महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
यातूनच त्यांची खरेदी विक्री संघाचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवड झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्या कार्याची दखल घेवून भाजपा या राष्ट्रीय पक्षाने जिल्हा यूवा मोर्चाचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक समाजपयोगी विधायक उपक्रम राबविले. तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघ पिंजून काढला व युवकांचा दांडगा जनसंपर्क वाढवला.
पक्षाचे इमाने इतबारे काम करत असताना संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मुद्दयावर मराठा समाजाला जाहीर व निर्भीडपणे पाठींबा दिला त्यामुळे पक्षाने बडतर्फीची कारवाई केली.
तरीही खचून न जाता त्यांनी पूर्ण क्षमतेने समाजकार्य चालु ठेवून आपल्या कार्याची छबी उंचावली आहे. वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. तालुक्यात युवकांची उस्फुर्त फळी त्यांच्या पाठीशी आहे . निष्ठावंत जगताप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोबत आहेत. फक्त मराठा समाजच नाही तर सर्वच समाजाच्या वतीने मतरूपी आशिर्वाद मिळू शकतो असे स्पष्ट चित्र आहे. जर जरांगे पाटलांकडून ही उमेदवारी मिळाली तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण आमदार म्हणून ते ओळखले जाऊ शकतात.