17/12/2024

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा काढण्यासाठी शेटफळ गावकऱ्यांवर प्रशासनाकडून दबाव ; ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

0
IMG-20230826-WA0008.jpg

शिवभक्तांमधून संतापाची लाट

करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा गेली वीस वर्षांपासून दिमाखात उभा होता मात्र काही कारणास्तव हा पुतळा खराब झाल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी एकजुटीने एकत्रित येऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे, मात्र पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन गावकऱ्यांना हा पुतळा काढून टाका नाहीतर गुन्हे दाखल करू अशी दमदाटी करत असल्यामुळे शिवप्रेमी संतापाची लाट उसळली आहे.

नागोबाचे शेटफळ येथील मंदिर संस्थांच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा गेली वीस वर्षापासून पुतळा होता या ठिकाणी दर्शनासाठी रोज शिवभक्त येत होते. या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. पण हा पुतळा उघड्यावर असल्यामुळे पुतळ्याला तडे गेले त्यामुळे सर्व शिवभक्तांनी एकत्रित येऊन त्याच ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसलेला आहे. मात्र आता प्रशासनाने या पुतळ्याची जबाबदारी घ्या असे सांगत हा पुतळा काढून घ्या अन्यथा कारवाई करू अशी लेखी पत्र गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना दिले आहे.

दुसरीकडे गावकऱ्यांनी मात्र रक्त सांडले तरी चालेल माघार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी मोठा संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे. शांतता असताना सर्व समाज एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असताना विणाकारण प्रशासन हस्तक्षेप करून गावात शांतता पुसरीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

याबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर वस्तुस्थितीचा मेल केलेला आहे. मंत्री कार्यालयाकडून योग्य ते सूचना प्रशासनाला येऊन सर्व शिवभक्तांच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळाकाढण्याची भूमिका बदलावी.

महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे मात्र छत्रपतींच्या पुतळ्याला प्रशासकीय अधिकारी अडकाठी आणत आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी यांनी योग्य ती कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा.

नितीन खटके, पुणे विभागीय कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

गेली वीस वर्षांपासून या जागी पुतळा होता त्याच जागी युवकांनी पुतळा उभा केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबत गावातील कोणाचीही तक्रार नाही असे असताना प्रशासन करत असलेली कारवाई गावकऱ्यांना मान्य नाही
भावनेचा विचार करून प्रशासनाने तोडगा काढावा.

विकास संदिपान गुंड, सरपंच शेटफळ

सदर पुतळ्या संदर्भात उप विभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार पुतळा काढण्यासंदर्भात लेखी पत्र सरपंचांना ग्रामसेवकांना दिले आहे.

विजय जाधव तहसीलदार करमाळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासंदर्भात ग्रामसभा झाली असून या ग्रामसभेत सर्व नागरिकांनी एक मुखाने पुतळा उभा करण्यास सहमती दर्शविलेली आहे.

दादासाहेब लबडे, शेटफळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page