शेटफळ येथील पत्रकार गजेंद्र पोळ यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्यासाठी शहिद जवान नवनाथ गात पुरस्कार प्रदान


जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
शेटफळ येथील दैनिक सकाळ चे पत्रकार गजेंद्र पोळ यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्यासाठी शहिद जवान नवनाथ गात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शहिद जवान नवनाथ गात यांच्या 21 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करमाळा तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते व ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष अॕड डॉ बाबुराव हिरडे, यशकल्याणीचे संस्थापक प्रा. गणेश करे- पाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रुर शिंदे तसेच शहिद गात यांचे बंधू नागनाथ गात व कुटुंबीयांचे उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
शेटफळ येथील गजेंद्र पोळ यांनी ग्रामसुधार समितीच्या माध्यमातून युवकांचे संघटन करत व्यसनमुक्त ग्राम ही संकल्पना प्रभावीपणे राबवली, जिव्हाळा गृपच्या माध्यमातून समाजातील अनाथांसाठी मदतीचा हात दिला. कोव्हिड काळात अनेकांना सहकार्य केले, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ग्रंथालय व वाचनालय स्थापन केले. कृषी गटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेती उत्पादन विक्रीसाठी प्रयत्न केले. दैनिक सकाळ माध्यम समूहातून पत्रकारिता करत विधायक कार्याला वृत्तपत्रांतून प्रसिध्दी दिली. नागोबाचे शेटफळ चे धार्मिक , पारंपारिक सण, ऐतिहासिक महत्व, सर्प रक्षक गाव ही ओळख सर्वदूर पोहोचवत पर्यावरण व निसर्गरक्षणाचे कार्य केले. या कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
समाजसेवा, क्रिडा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रतिवर्षी हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जातो. 21 वा स्मृतीदिन व पुरस्कार सोहळा वरकुटे येथे 2 मार्च रोजी संपन्न झाला.




