विदर्भातील तरूणांची करमाळा तालुक्याला भेट; घेतली समज जीवनाची माहिती
चिखलठाण, दि. 15 (करमाळा-LIVE)-
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यावतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार “अभिसरण युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत “विदर्भातील तरुणांनी करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील समाज जीवनाची माहिती घेतली.
आधुनिक पद्धतीने होत असलेली शेती, विविध उपक्रमाच्या माध्यमातून बदलेल्या स्मार्ट जिल्हा परिषदेच्या शाळा, शेती पूरक व्यवसायाच्या माध्यमातून साधलेली प्रगती येथिल प्राचीन मंदीरे यांची माहिती घेतली असून 19 मे रोजी पुणे येथील असलेल्या कार्यक्रमात वैशिष्ट्य पुर्ण बाबींचे सादरीकरण केले जाणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने आयोजित केलेल्या अभिसरण मोहीमेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे आचार, विचार, भाषा, आवडी-निवडी, सवयी संस्कृतीची व विविध ठिकाणी सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती विदर्भातील तरूणांना व्हावी विविध महीतीचे आदानप्रदान व्हावे यासाठी गडचिरोली, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वाशिम जिल्ह्यातील नऊ तरूणांच्या अभ्यासगटाने करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठी लागवडी पूर्व मशागती पासून मार्केटिंग पर्यंतचे सर्व काम करणाऱ्या लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याची माहिती घेतली.
प्रगतशील शेतकरी नानासाहेब साळुंके, हर्षाली नाईकनवरे यांच्या शेतातील सुरू असलेले विविध प्रयोग पाहीले तर वैभव पोळ या अल्पशिक्षित तरुणाने स्थानिक शेतकऱ्यांची गरज ओळखून आपल्या स्वतःच्या शेतात ठिबक व पीव्हीसी पाईप उत्पादन सुरू करून केलेल्या प्रगतीची पाहणी करत त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. येथील पुरातन नागनाथ मंदिर व शेटफळ गावच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती घेतली तालुक्यातील कोंढार चिंचोली व खातगाव येथील प्राथमिक शाळेत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सायान्स वॉल व क्षमता विकसित करण्यासाठी सुरू असलेले वेगवेगळे प्रयोग पाहून भारावून गेले तर कोंढारचिंचोली येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने यशस्वी केलेला दुग्ध व्यवसाय व ट्रॅक्टर व्यावसायातून साधलेली प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केले.
शेवटी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी या गटातील तरुणांची भेट घेऊन त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी कोंढारचिंचोलीचे सरपंच भोसले, लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, गजेंद्र पोळ, सुहास गलांडे, प्रशांत नाईकनवरे, विजय लबडे, महावीर निंबाळकर, भाऊसाहेब निंबाळकर, सनी पोळ, सागर पोळ यांच्यासह परिसरातील तरुण उपस्थित होते.