इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी- गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील
करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी आहे असे मत गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
स्व. लिलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील होते. यावेळी ग्रामसुधार समिती करमाळाचे अध्यक्ष अॕड बाबुराव हिरडे, विस्ताराधिकारी जयवंत नलवडे, विस्ताराधिकारी सुग्रीव नीळ, डेल्टा सोलापूर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मुचंडे, करमाळा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष कल्याणराव साळुंके, सचिव गोपाळ तकीक-पाटील, मुख्याध्यापक बाळकृष्ण लावंड, श्रीमती थोरड, रेवन्नाथ आदलींग, उपस्थित होते.
पुढे बोलताना गट शिक्षणाधिकारी श्री.पाटील म्हणाले की, दैनंदिन व्यावहारीक जीवनात इंग्रजी भाषेचा अधिकाधिक वापर होत आहे त्यामुळे मातृभाषेप्रमाणेच व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी भाषेकडे पहावे लागेल. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनावर इंग्रजी बोलण्या विषयी न्युनगंड व भिती निर्माण होऊन प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसारखे अभिनव उपक्रम महत्वपूर्ण आहेत. करमाळा तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन तळमळीने कार्य करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्यास सर्व इंग्रजी शिक्षक योग्य प्रकारे मार्गदर्शन व मदत करत आहेत. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने करमाळा इंग्लिश लॅंग्वेज टीचर्स असोसिएशन तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतावृध्दी व भाषिक विकास यासाठी पुढाकार घेत आहे.
शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक दर्जासाठी अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही करमाळ्याचे गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी दिली. या स्पर्धेत माध्यमिकसह व प्राथमिकच्या एकूण 74 शाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये निवडक 225 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेता आला. यावेळी प्रा. गणेश करे-पाटील व मान्यवरांचे हस्ते स्पर्धा विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले.
यशकल्याणी संस्थेमार्फत प्रथमच बालगौरव पुरस्कार सुरू करण्यात आले. पहिला बालगौरव पुरस्कार प्रा.करे- पाटील यांचे हस्ते कु.सृष्टी आदलिग ह्या दिव्यांग विद्यार्थिनीस प्रदान करण्यात आला.
यावेळी एस.एस.सी. मार्च 2023 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह तसेच मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव गिलबीले, मारूती जाधव, रेवन्नाथ आदलींग यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्रजी शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले.