संजयमामा शिंदे टाईमपास म्हणून आदिनाथच्या निवडणुकीत ; विधानसभेला पराभव का झाला याचे अगोदर आत्मचिंतण करावे- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)-
संजयमामा शिंदे बिनकामाचे व निष्क्रिय असून टाईमपास म्हणून निवडणुकीत उतरले असल्याचा घणाघाती प्रहार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता प्रचारास वेग आला असून एकमेकांच्या विरोधात टिका टिपणी जोरदार पणे चालू आहे. यावरुनच आज पाटील गटाकडुन थेट माजी आमदार संजयमामा शिंदे यांना लक्ष केले गेले.
याबबत बोलताना तळेकर म्हणाले की, माजी आमदार संजयमामा शिंदे हे आमदार पदावरुन काम करण्यास लायक नसल्याने जनतेने त्यांना घरी बसवले आहे. त्यांनी जनतेची केलेली फसवणुक व त्यांची निष्क्रियता यावर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांना ९६ हजार मते मिळाली. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यासह माढा तालुक्यातील छत्तीस गावांनीही आबांना भरगोस मतदान केले. यामुळे आता संजयमामा शिंदे यांनी आत्मचिंतन करावे.
करमाळा तालुक्यातील जनतेपाठोपाठ करमाळा तालुक्यातील नेतेमंडळीनी सुद्धा संजयमामा शिंदे यांना चांगलेच ओळखले आहे. ज्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कृपादृष्टी मुळे संजयमामा २०१९ मध्ये आमदार झाले होते त्याच आदरनीय जयवंतराव जगताप यांनी २०२४ मध्ये त्यांना पाडले व नारायण (आबा) पाटील यांना आमदार केले. बागल गटासही पोखरणाऱ्या संजयमामा शिंदे यांना बागल समर्थक या निवडणुकीत जागा दाखवल्या शिवाय राहणार नाहीत. संजयमामा शिंदे यांनी स्वतः ला सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणुन काही काळ मिरवले. पण मोहिते-पाटील यांनी एकाच गोळीत दोन शिकारी केल्या व दोन्ही शिंदे बंधुना घरी बसवले. यामुळे उगीच करमाळा तालुक्यातील राजकारणात ढवळाढवळ करणे संजयमामा शिंदे यांनी सोडुन द्यावे. करमाळा तालुक्यातील राजकारणास फसवेगीरीचा व्हायरस जनता लागू देणार नाही. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेल्या आमदार नारायण आबा पाटील यांचेवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पण संजयमामा शिंदे यांचे वर शेतकऱ्यांना व विविध बँकाना करोडो रुपयास खोटी कर्ज प्रकरण करुन गंडवल्याचा आणि करोडो रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला. विशेष म्हणजे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे प्रत्यक्षात भेटुन प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरावे सुध्दा सादर केले होते. हे प्रकरण अजून पुर्णपणे मिटले नाही.आजही करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिबील खराब झाले म्हणुन बँका कर्ज देत नाहीत.
यामुळे संजयमामा शिंदे यांनी अगोदर म्हैसगाव येथील कारखाना का विकला व खोटी कर्ज प्रकरण काय आहेत याबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन तळेकर यांनी केले.