कार्यकर्त्यांनो दांडा जपून ठेवा ; आगामी जिल्हा परिषषद, पंचायत समिती अन् नगरपालिका निवडणुकीत कोणता ‘झेंडा’ हाती घ्यावा लागेल सांगता येणार नाही

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)-
कार्यकर्त्यांनो दांडा जपून ठेवा कारण झेंडा कोणता हाती घ्यावा लागेल सांगता येणार नाही अशी परिस्थिती सध्या तालुक्यातील एका राजकीय गटावर आली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक आणि आदिनाथ निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुढची भुमिका काय असेल हे कार्यकर्त्यांना अजूनही माहिती नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कारण विधानसभेला वेगळी भूमिका अन् आदिनाथ मध्ये वेगळी भूमिका होती.
२०१४ लोकसभा आणि विधानसभेपासून सतत वेगवेगळ्या पक्षातून तर कधी अपक्ष राहिल्यामुळे कार्यकर्ते आजही संभ्रमात आहेत. विधानसभा संपली, आदिनाथ कारखाना निवडणूक संपली, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तसेच करमाळा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. प्रमुख राजकीय पक्ष म्हणून टिकाव लावण्यासाठी ह्या सगळ्या निवडणुका लढणे गरजेचे आहे. विधानसभा, आदिनाथ नंतर आता कुठल्या पक्षात जाणार की कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार की अपक्ष राहणार हे गुलदस्त्यात असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असून कार्यकर्त्यांनो दांडा जपून ठेवा झेंडा कोणता हाती घ्यावा लागेल हे सध्यातरी सांगता येत नाही अशी चर्चा तालुकाभर सुरू आहे.