17/12/2024

भाऊंच्या हाती करमाळा विधानसभेची चावी ; २०२४ विधानसभेला जगतापच राहणार किंगमेकर

0
IMG_20240624_212811.jpg

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
माजी आमदार जयवंतराव जगताप भाऊंच्या हाती करमाळा विधानसभेची चावी असून २०२४ विधानसभेला जगताप च किंगमेकर ठरणार आहेत अशी चर्चा आता करमाळा विधानसभा मतदारसंघात सुरू झालेली आहे.

कोणी मान्य करो अथवा न करो परंतु करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या गत पाच वर्षाच्या राजकीय घडामोडींचा अभ्यास करता व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील जनतेच्या कलाचा अंदाज घेतला असता करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे जो निर्णय घेतील अथवा ज्याला समर्थन देतील तोच करमाळा विधानसभेचा आमदार होईल हे निर्विवाद सत्य आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीतील घडामोडीच्या दुष्परिणामातून करमाळा तालुक्याची राजकीय घडी विस्कटली व याचा फायदा आमदार संजयमामा शिंदे यांना झाला.

बाजार समिती निवडणुकीतील षडयंत्राचा राग डोक्यात धरून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मत विभागणी टाळत प्रथमच स्वतः विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि माजी आमदार नारायण आबा पाटील व बागल गटाला शह देताना आमदार संजयमामा शिंदे यांना समर्थन देत विधानसभेवर पाठवले.

जगताप यांच्याकडे असलेली निष्ठावंतांची एकगठ्ठा मते, जगताप यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मतदारांवर असलेला प्रभाव, जगताप यांची राजकीय उपयुक्तता या बाबींची मोहिते पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पुरेपूर जाण आहे.

यामुळेच बाजार समिती निवडणुकीत जगताप यांना समर्थन देण्यासाठी मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाल्याचे दिसून येत आहे.

मोहिते-पाटील यांच्याबरोबरच आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह रश्मी बागल देखील सध्या जगताप यांना न दुखावण्याच्या भूमिकेत आहेत अशी चर्चा सुरू आहे.

बागल, पाटील व संजयमामा यांच्या राजकीय उत्कर्षाचे मूळ जनक जयवंतराव जगताप आहेत हे देखील वास्तव आहे. यामुळेच सन 2023 झालेल्या बाजार समिती निवडणुकीत बुद्धी चार्तुयाने व अक्कल हुशारीने जयवंतराव जगताप यांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करून दाखवली.

सद्यस्थितीत माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या बद्दल मतदारांमध्ये सहानुभूती दिसून येत असली तरी या सहानुभूतीचे रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर आमदार संजयमामा शिंदे यांचे बद्दल थेट मतदारांशी असलेल्या कनेक्टिव्हिटीचा अभाव यामुळे नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार करमाळ्यासह माढा विधानसभा मतदारसंघात बॅकफुटवर जाणे तसेच राज्यातील राजकीय घडामोडींचा शिंदे बंधूंच्या राजकीय कारकीर्दीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचे समोर सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यायची अथवा अपक्ष म्हणून पुरस्कृत उमेदवारी करायची तरी देखील शासनाबद्दल असलेली जनतेतील नाराजी यामुळे नफा नुकसानीचा विचार करता आमदार संजयमामा शिंदे व त्यांचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने कर्जरूपी केलेल्या मदतीमुळे रश्मी बागल या पक्षादेश मानणार की विधानसभा लढणार हे ही आगामी काळात पहावे लागणार आहे.

२०१९ ची निवडणूक वगळता स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप हे निवडणूक लढवणार का? याची जनतेला उत्सुकता लागून राहिलेली आहे. जनतेला गृहीत धरून राजकारण करण्याची दिवस राहिलेले नाहीत याची नोंद मात्र सर्व विधानसभा इच्छुक उमेदवारांनी घेणे गरजेचे आहे.

करमाळा तालुक्यातील आदिनाथ, मकाई या कारखान्यांची झालेली दुरावस्था, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण, शासकीय कार्यालयात बोकाळलेला भ्रष्टाचार, वीज, पाणी, प्रश्नामुळे जनता त्रस्त झालेली आहे. जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे राज्यकर्त्यांकडून झालेले दुर्लक्ष याचे प्रतिबिंब येत्या विधानसभा निवडणुकीत उमटणार याची नोंद सर्व इच्छुक उमेदवारांनी घेणे गरजेचे आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा काही हजारांवर नव्हे तर शेकडो मतांत देखील लागतो अशी येथील राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे करमाळा मतदारसंघातील गटातटाच्या असलेल्या प्राबल्याचा विचार करता कुणी कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी करो निवडणुकीच्या निकालाची चावी मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याच हातात आहे हे मात्र निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page